प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करायला हवे : साठे
मराठा मंडळातर्फे दसरा महोत्सव साजरा ; पुरस्काराचेही वितरण
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- समाजातील मुलांना आज मार्गदर्शनाची गरज असून ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करायला हवे. त्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही. समाजात आपुलकी, सद्भावना असायला हवी. त्या माध्यमातून आपण समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी काढले. छत्रपती शिवाजी प्रशालेतील राजर्षी शाहू सभागृहात मराठा समाज सेवा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित दसरा महोत्सव कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा साठे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विनायकराव पाटील, सचिव नामदेव थोरात, प्राचार्य अनिल बारबोले, शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले. साठे पुढे म्हणाले, समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी मराठा समाज सेवा मंडळाच्या माध्यमातून समाजातील चांगल्या लोकांच्या कार्याला प्रेरणा देण्याचे काम ही खरोखर अभिमानास्पद अशीच बाब आहे. संस्थेचे अध्यक्ष सपाटे म्हणाले, माणूस जातीने नाही तर कर्तुत्वाने श्रेष्ठ ठरतो. म्हणून प्रत्येकाने आपले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी श्रम, नीती आणि निष्ठा या गुणांचा अवलंब केला तर यशाचे शिखर गाठणे शक्य होईल. दरम्यान,यावेळी सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिंदे यांचे 'आजची बदलती परिस्थिती आणि वैचारिक सीमोल्लंघनाची गरज' या विषयावर व्याख्यान झाले. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, समाजातील संवाद कमी होत चालला असून तो हरवलेला संवाद कमी करण्याचे कार्य मराठा समाज सेवा मंडळ करीत असून ही कौतुकास्पद बाब आहे. आज कुटुंबातील संवाद निर्माण होणे देखील तितकेच महत्त्वाचे असून कुटुंबातील संवादाचे संस्कार पीठ नष्ट होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच राष्ट्र प्रेमाबद्दल बोलताना त्यांनी स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठी जगण्याचे आवाहन करून समाजातील वाढती दरी कमी व्हायला
पाहिजे,अशीअपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी मराठा समाज सेवा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित दसरा महोत्सव कार्यक्रमात जलतरणमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या श्रावणी दत्तात्रय सूर्यवंशी व बालग्राम आणि वृद्धाश्रमाचे संस्थापक प्रसाद मोहिते यांचा शिवतीर्थ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, ॲड. मल्हार बन्ने,माऊली लँडमार्कचे माऊली झांबरे, नितीन देशमुख, बंडोपंत चव्हाण, गुरूसिध्दप्पा कापसे, नागेश हावळे यांचाही गौरव करण्यात आला. तसेच पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दसऱ्यानिमित्त सोने लुटण्याचा कार्यक्रमही पार पडला. यावेळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक वसंत सावंत, अशोक चव्हाण, महादेव गवळी, सूर्यकांत इंगळे, रेखा सपाटे, सुनीता साळुंके, शिवदास चटके, प्रभाकर खंडाळकर मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, नागनाथ नवगिरे, भानुदास घंदुरे, दत्ता भोसले यांच्यासह सर्व समाजबांधव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पंडित- महामुनी यांनी केले. आभार सरचिटणीस प्रा. महेश माने यांनी मानले.
यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, विनायकराव पाटील, ज्ञानेश्वर सपाटे, प्रा. महेश माने व अन्य.उपस्थित होते

0 Comments