'नवरात्र : आदिशक्तीचा उत्सव'
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- नवरात्र हा आदिमाया,आदिशक्तीचा उत्सव ,स्त्रीच्या पराक्रमाचा उत्सव, स्त्रीच्या कर्तृत्त्वाचा उत्सव, स्त्रीच्या गौरवाचा उत्सव समजला जातो. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत भारतात नवरात्र उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या नवरात्राला 'शारदीय उत्सव' असेही म्हटले जाते. नवरात्र या उत्सवात शक्तीची अर्थात देवीची पूजा केली जाते. नवरात्रातील नऊ दिवस देवीची विविध प्रकारे आराधना केली जाते. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी नवरात्र व्रताची माहिती देताना म्हटले आहे की पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा आरंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तीवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारुढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्णयंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्ती नऊ दिवस उपवास करते. व्रतस्थ राहते. अश्विन शुद्ध नवमी अखेर हे व्रत चालते. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ केला जातो. अखंड दीप लावला जातो. घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधल्या जातात. क्वचित होम हवन व बलिदान ही करतात. काही ठिकाणी नऊ दिवस रोज कुमारी पूजा करून तिला भोजन घालतात. शेवटी स्थापित घट व देवी यांचे उतथापन करतात. नवरात्रीचा हा उत्सव कृषीसंस्कृतीचा महत्त्वाचा उत्सव आहे. तांत्रिक युगामध्ये शाक्त संप्रदायात उत्सवाला विशेष महत्त्व होते. आजही घटस्थापना केली जाते.
सिंधू संस्कृतीमध्ये शेती ही स्त्रियांच्या हातात होती. शेतीतीलच 'घटस्थापना' हा एक प्रयोग होता. कमी पाण्यावर कमी उजेडात कोणते पीक यावर्षी चांगली येईल हे या प्रयोगाद्वारे तपासले जात होते. या तांत्रिकी प्रयोगात अंधार असलेल्या खोलीत कडधान्य मिसळलेल्या मातीवर पाण्याने भरलेला घट ठेवला जात असे, या घटातून पाणी पाझरून पेरलेल्या बीजांचे रुजणे, अंकुरणे, वाढणे या प्रक्रिया होत असत. शेवटच्या दिवशी जे धान्य उंच वाढते ते काढून घेण्यात येई. ते टोप्यात खोचून किंवा फेट्यात खोचून ते गावभर मिरवले जाई. दहाव्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी गावातील पंच सर्वाधिक धान्य ज्या फेट्यामध्ये दिसले ते धान्य सर्वांनी पेरावे असे सांगत.
तांत्रिकीचा प्रवाह सिंधू नदीच्या खोऱ्यातील भात शेतापासून सुरू होता. तिथे तांत्रिकीची मुख्य स्त्री अर्थात गणमाता, कुलस्वामिनी अन्नधान्याचे समान वाटप करून समता, बंधुता, स्वातंत्र्य रुजवत असे हा प्रवाह पुढे मराठवाड्यातील तेरणा मांजरेच्या किनाऱ्याला तुळजा येईपर्यंत चालला होता. येथेही तुळजा आपल्या प्रजेला परडीने धान्याचे समसमान वाटप करत असे. हे वाटप ती तुला करून करत असे म्हणूनच तिचे नाव तुळजा पडले असावे. डॉ. अशोक राणा , नितीन सावंत यांनी आपल्या संशोधनात याचे सविस्तर वर्णन केलेले आढळते.
एकूणच नवरात्र हा आदिशक्तीचा, आदिमायेचा उत्सव आहे समजून येते. सिंधू संस्कृतीची स्त्री अत्यंत कर्तृत्ववान ,उद्यमशील, स्त्री होती तिच्यामध्ये नवनिर्माणाची क्षमता होती. डॉक्टर दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या मते इसवी सन पूर्व 600 च्या अगोदर दख्खनच्या पठारावर कृषक समूह होते; ज्यामध्ये स्त्रियांच्या हातात शेती होती, भांडी बनविण्याचा उद्योग होता, स्त्रियाच वस्त्रनिर्मिती करत, स्त्रिया धार्मिक प्रथा सांभाळत ,पौरोहित्य करत असत, तंत्र मंत्र यामध्ये पारंगत असत. संशोधक रा चिं ढेरे यांनीही याला दुजोरा देताना म्हटले आहे; दख्खनच्या पठारावर मातृ पूजक समाज होता ज्यामध्ये भूमातेची, लज्जागौरीची पूजा केली जात असे. इतिहासावर नजर टाकली असता आपल्याला हेच आढळते सिंधू संस्कृतीच्या मातृसत्ताक परंपरेचा घटस्थापना हा एक महत्त्वाचा भाग होता. आज मात्र या घटस्थापनेला ,नवरात्रीला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. आजची स्त्री सिंधू संस्कृतीतल्या स्त्रीप्रमाणे कर्तृत्ववान,नवनिर्माणाची क्षमता असलेली, सर्जनशील स्त्री राहिली नाही. आजची स्त्री ज्ञानविज्ञान तंत्रज्ञान शिक्षण, विधी, आरोग्य राजकारण या सर्व क्षेत्रात असूनही जुन्या रूढी परंपरांना न जाणताच, न समजून घेता केवळ अंधत्वाने त्यापुढे नेताना दिसते आहे. विज्ञानवादी नाही.
स्त्रीचा गौरव करणारा नवरात्रीचा उत्सव भारतभर अत्यंत उत्साहात साजरा केला जातो परंतु वास्तवामध्ये स्त्रीचा गौरव मात्र केला जात नाही.स्त्रीत्वाला आजही प्रतिष्ठा नाही. हुंडा ,देणघेणं, मानपान, विवाह नंतरचे पहिले सणवार या सगळ्यांमध्ये स्त्रीला ,तिच्या माहेरच्या लोकांना हीन लेखले जाते. आजची स्त्री शिक्षणासाठी,नोकरीसाठी बाहेर पडताना तिला सतत पुरुषी अत्याचाराला सामोरे जावे लागते. प्रत्येक घरामध्ये आजही स्त्रीला समान वागणूक मिळत नाही.
वर्ल्ड इकॉनोमिक फोरमने केलेल्या 146 देशांच्या सर्वेक्षणात स्त्री पुरुष समानतेमध्ये आपल्या देशाचा 135 वा क्रमांक आहे हा क्रमांकच दर्शवतो आहे स्त्री सन्मानाचा उत्सव साजरा करणारा देश स्त्रीला समान हक्क देण्यात किती मागे आहे. समाज मनावर 'न स्त्री स्वातंत्र्यम अहिरती'असे सांगनाऱ्या मनूचा किती प्रभाव आहे.
2019 मध्ये 31 हजार 600 स्त्री बलात्कार झाले तर 2022 मध्ये 35000 बलात्कार झाले. आजही स्त्री गर्भाचे उत्साहात स्वागत होताना दिसत नाही. वंशाच्या दिव्याला अजूनही खूप सगळे महत्त्व आहे. त्यामुळे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर विषम आहे. एक हजार पुरुषांमागे केवळ 137 ते 140 स्त्रिया आहेत. एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलींवर होणारे अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तिचे असे स्वतःचे विचार आहेत, तिच्या जगण्यावर तिचा अधिकार आहे, स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा तिला हक्क आहे हे तरुण पिढी विसरताना दिसते आहे. म्हणूनच तिचा नकार तरुण पिढी पचवू शकत नाही. स्त्री पुरुष समानतेचा प्रारंभ प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या घरापासूनच केला तर हे चित्र नक्की बदलेल.
एकेकाळी संपूर्ण कुलावर ,गणावर स्वतःचे वर्चस्व असलेली मातृ प्रधान संस्कृतीची स्त्री आज पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्वतःचे मूळ स्वरूप पूर्णपणे विसरून गेलेली दिसते. म्हणूनच तिचा अर्थार्जनात सहभाग अत्यंत कमी आहे. भारताच्या जीडीपी मध्ये स्त्रियांचा सहभाग केवळ 17 टक्के आहे. हा सहभाग पन्नास टक्के झाला तर भारताचा विकासदर 9.7% होऊ शकतो. याचाच अर्थ स्त्रिया अर्थार्जनात पुरुषाच्या बरोबरीने सहभागी झाल्या तर भारत प्रगत राष्ट्र विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. परंतु तसे होताना दिसत नाही.
कामगार क्षेत्रामध्ये पुरुषांचे प्रमाण 70 टक्के आहे तर स्त्रीचे केवळ 19 टक्के आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की आजची स्त्री असण्यापेक्षा दिसण्याला अधिक महत्त्व देते आजही तिला शोभेची बाहुली म्हणून घेण्यात अधिक स्वारस्य आहे.व्हर्जिनिया ऊल्फ,ग्रीयेर जर्मन या परदेशातील स्त्रीवादी स्त्रिया म्हणतात 'स्त्री आंदोलनातून भारतीय स्त्री ने काय मिळवले तर लिपस्टीक, सॅंडल आणि तंग कपडे,भारतीय स्त्री क्रांतीला 'कॉस्मेटिक क्रांती' म्हणून हिनवले जाते.हे चित्र बदलणे गरजेचे आहे. वाचनालयात नेहमी शांतता असते; तर ब्युटी पार्लरमध्ये प्रचंड गर्दी असते.आजची स्त्री स्वतः च्या हक्कापेक्षा ,कर्तृत्वापेक्षा सौन्दर्य महत्वाचे मानते.
आजही स्रियांना घराबाहेर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बोलविण्यात येते तेव्हा त्या याव्यात यासाठी पैठणी,सोन्याची नथ अशी आमिशे दाखवावी लागतात, स्वर्गप्राप्ती ,मोक्ष मिळविण्यासाठी त्या अनेक धार्मिक कार्यक्रमाला जातात, पण माता पालक मेळाव्यात गैरहजर राहतात,स्त्री ला हीन लेखणाऱ्या प्रथांचे स्त्रिया च समर्थन करतात,मुलांना वाढविताना समानतेने वाढवत नाहीत, स्त्री अजूनही स्त्री वाद समजू शकत नाही, स्वतः च्या हक्कासाठी जागृत नाही.स्त्री जागी झाली नक्कीच अत्याचार कमी होईल. आज स्त्री सुरक्षा हे मोठे आव्हान आहे, त्यासाठी अत्यंत कडक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी गरजेची आहे, हे सारे झाले तर हा शक्तीचा उत्सव नक्की सार्थकी लागेल अन्यथा हा केवळ कर्मकांडाचा एक भाग होईल.आजही पदमा गोळे यांच्या कवितेच्या ओळी स्मराव्या वाटतात..
'नाही हो मी नुसती नार
पेजेसाठी जी लाचार
शेजेसाठी आसुसणार
मी माणूस आधी
माणूस म्हणून जगणार'
डॉ स्मिता पाटील
मोहोळ, जि सोलापूर

0 Comments