२००० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला अँटीकरप्शन
पोलिसांनी केली अटक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दोन हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात शहर वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षकाला अँटीकरप्शन पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत बलभीम जाधव (वय 57, रा. सोलापूर) असे लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी सोलापूर शहर पोलीस दलात अनेक वर्ष अंमलदार म्हणून सेवा बजावली. त्यानंतर परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. दोन-तीन दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहनचालकावर कारवाई केली होती. या कारवाईमधील वाहन सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी 2700 रुपये मागितले. गुरुवारी (ता. 12) दुपारच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय परिसरात जाधव यांनी तक्रारदाराकडून 2700 रुपये घेतले. यातील 700 रुपयांची ऑनलाईन पावती केली. राहिलेली दोन हजाराची रक्कम लाच स्वतःकडे ठेवली. लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:
Post a Comment