विशेष अधिवेशन घ्या...आणि मराठ्यांना आरक्षण द्या..
आ.यशवंत माने यांनी मांडली स्पष्ट भूमिका...!
उपमुख्यमंत्री अजित पवार उचलणार सिंहाचा वाटा..!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळामध्ये आपले स्वतःचे वजन वापरून विकास निधी खेचून आणणारे कर्तव्यदक्ष आमदार म्हणून यशवंत माने ओळखले जातात. आमदार यशवंत माने यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण ताबडतोब द्यावे. अशी मागणी लावून धरल्यामुळे त्यांच्या या भूमिकेचे मराठा समाजातून कौतुक केले जात आहे.
आ.मानेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघांत आपल्या कार्यकाळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणल्यामुळे विकास कामाला चालना मिळाली. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक सर्वत्र होत असतानाच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यक्रम आपण रद्द करून विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीकडे जोर धरत असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगून एक प्रकारे मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.
त्यांच्याबरोबरच मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांनीही मोहोळ तालुक्यातील दौरे रद्द करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केलं आहे.
आ. यशवंत माने मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य माणसांच्या अडचणी दूर करण्यासाठी दर आठवड्याला मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात जनता दरबार घेत होते. परंतु इथून पुढे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जनता दरबार होणार नाही असे त्यांनी ठामपणे जाहीर केलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी ठाम भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
सर्व घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांनाही आरक्षण मिळालेच पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे. आणि निश्चितपणे मराठ्याला आरक्षण देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर पडत असून सध्या मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्यामुळे हा प्रश्न अधिकच मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साखळी उपोषणात सहभाग घेतला. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नसल्याचं या लोकनेते परिवाराकडून सुद्धा जाहीर केलेलं आहे. अतिशय संघर्षाच्या या काळामध्ये मराठा समाजाच्या पाठीमागे या सर्व नेत्यांनी ठामपणे उभा राहून मराठा आरक्षणाची लढाई लढण्यासाठी आम्हीही मराठा समाजासोबत आहोत त्यामुळे आरक्षणाची लढाई आपण जिंकणारच असा विश्वास आ. यशवंत माने यांनी बोलून दाखविला.
राज्यातील गरजवंत मराठ्यांनी पुकारलेला हा लढा निश्चितच क्रांतीदायी असून यामध्ये त्यांना यश मिळणार असल्यामुळे मोहोळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपण मराठा समाजासोबत असल्याचं त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.
0 Comments