वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी 20 गावातील समाज मंदिरांमध्ये
सुसज्ज अभ्यासिका उभारणार...!
समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांची माहिती....!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या मोबाईल युगामध्ये तरुणांमध्ये वाचनाची आवड कमी होऊ लागल्यामुळे वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी मोठ्या 20 गावातील अनुसूचित जाती बहुल अशा वस्ती मधील समाज मंदिरामध्ये विद्यार्थी, आणि शेतकऱ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका लवकरच उभा करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.
पुढे बोलताना खमितकर म्हणाले की, "
प्रत्येक तालुक्यातील पाच ते दहा हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येकी एका गावातील दलित वस्त्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वीस अभ्यासिका सुरू करण्यात येणार असून त्या गावातील समाज मंदिरामध्ये फर्निचर सह उभा करण्यात येणार असून त्याचे संपूर्ण व्यवस्थापन ग्रामपंचायतीतर्फे होणार असून त्याबाबतचा करार करण्यात येणार असून यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने पुढाकार घेतला असून सध्या या योजनेसाठी 80 लाखाची तरतूद करण्यात आल्याचं खमितकर यांनी सांगितलं. जिल्ह्यातील साधारणपणे हजारो ग्रामपंचायतीमध्ये एकूण 4000 पेक्षा अधिक अनुसूचित जातीची अधिक लोकसंख्या असलेल्या वस्त्या आहेत. त्या ठिकाणी साडेचार लाखापेक्षा अधिक समाजबांधव राहत असल्यामुळे त्यांना अभ्यासिकेची गरज असल्यामुळे ही योजना समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय व अभियांत्रिकी पूर्व परीक्षांसह कृषी क्षेत्राचा अभ्यास करणारे दीड लाखाहून अधिक तरुण आणि तरुणी ग्रामीण भागामध्ये राहतात. त्यांना केवळ पुस्तक रुपी साधने उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच स्पर्धा परीक्षासह मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक पुस्तकांची गरज ओळखून हा प्रकल्प शासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा सह नीट, इंजीनिअरिंग, राज्य व लोकसेवा आयोग, आणि कृषी अभ्यासक्रमाची पुस्तकं या अभ्यासिकेमध्ये उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना दिलासा मिळणार असून या प्रकल्पामुळे ग्रामीण मातीतील अधिकारी नव्या जोमाने प्रचंड मेहनत घेऊन चिकाटीने अभ्यास करून देशाला मोठं भविष्यात योगदान देतील. हाच शासनाचा हेतू आहे. पहिल्या टप्प्यातील अभ्यासिकांचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या अभ्यासिकांचे काम करण्यासाठी आणखी एक कोटीची मागणी वित्त आयोगाकडे करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी शेवटी बोलताना दिली.
.jpg)
0 Comments