बस-रिक्षाच्या अपघातात वृद्धेसह बाळाचा मृत्यू
वैराग येथील गणपती मंदिरासमोर दुर्घटना; बाळाच्या आईसह चौघे जखमी
वैराग (कटूसत्य वृत्त): एसटी व रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा महिन्यांच्या बाळासह एका वृद्धेचा उपचारापूर्वीच मृत्यू तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. ३१) सायंकाळी पाचच्या सुमारास वैराग येथे गणपती मंदिरासमोर घडली.जखमींना उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
बार्शीहून सोलापूरकडे जाणारी एसटी (एमएच १४ बीटी ४३३७) वैराग येथील गणपती मंदिराजवळ आली.असता त्याचवेळी रिक्षा (एमएच १३- जी ४४५८) गणपती मंदिराकडून रस्ता क्रॉस करून इंदिरानगरकडे चालली होती.
त्यावेळी रिक्षा व एसटीमध्ये जोराची धडक बसली. या धडकेत रिक्षा सुमारे शंभर फूट फरफटत गेली. या भीषण अपघातात ध्रुपाबाई आणाप्पा देवकर (वय ६५, रा. सुरतगाव, ता. तुळजापूर) व ऋतुराज बालाजी चौगुले ( वय सहा महिने, रा. वैराग) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर श्रावण अविनाश देवकर (वय ५), सोनाली बालाजी चौगुले (वय २७), रिक्षाचालक पांडुरंग माळी (वय ५४, सर्व रा. वैराग) तर ऐश्वर्या जाधव (वय २८, रा. सुरतगाव) हे जखमी झाले.
आजारी बहिणीला पाहायला आल्या होत्या ध्रुपाबाई
वैराग येथील काशिनाथ शिंगाडे यांची आई सावित्राबाई पंधरा दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी सुरतगाव येथील सावित्राबाईंची बहीण ध्रुपाबाई देवकर या वैरागला आल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी (ता. ३१) संतनाथ महाराज यांची यात्रा पाहून त्या त्यांच्या नातेवाईक सोनाली चौगुले व त्यांच्या सहा महिन्यांच्या ऋतुराजसह रिक्षाने घरी जात असताना झालेल्या बसच्या अपघातात धुपाबाई यांच्यासह ऋतुराजचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment