मोहोळ शहरात होणार सुसज्ज अशी न्यायालय इमारत ; वरिष्ठ जिल्हा
न्यायाधीशाकडून जागांची पाहणी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- नवीन न्यायालयीन इमारत उभारणी साठीच्या हालचाली सुरू झाल्या असून, सोलापूर येथील वरिष्ठ जिल्हा न्यायाधीश, प्रबंधक, जिल्हा न्यायालय इमारत प्रमुख यांनी शहरातील चार ठिकाणच्या जागांची पाहणी केली असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव यांनी दिली.ही इमारत झाल्यास मोहोळ शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
मोहोळ शहरातील मोहोळ- पंढरपूर- आळंदी या पालखी मार्गावरील इमारतीत सध्या न्यायालयाचे कामकाज चालते. यापूर्वी या इमारती समोर वकील, पक्षकार यांची वाहने पार्किंग साठी तसेच त्यांना बसण्यासाठी मोठी जागा उपलब्ध होती. मात्र पालखी मार्गाच्या कामासाठी न्यायालयाच्या इमारती समोरील जागा मोठ्या प्रमाणात संपादित झाली आहे. त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. तसेच वकीलांची, पक्षकारांची वाढती संख्या यामुळे सध्याची इमारत तोकडी पडत आहे. न्यायालयासाठी नवीन इमारत व्हावी या साठीचा मोहोळ बार असोसिएशनचा ठराव यापूर्वीच वरिष्ठांना पाठविल्याचे अध्यक्ष अॅड हेमंत शिंदे यांनी सांगितले.
ही न्यायालयाची इमारत तयार होताना पुढील 50 वर्षाचे नियोजन, वाढती न्यायाधिशांची, वकील, पक्षकार व खटले यांची संख्या तसेच बस स्थानका पासून न्यायालयाचे अंतर या गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत. यावेळी मोहोळ येथील मुख्य न्यायाधीश श्री ठोंबरे, न्यायालयीन अधीक्षक नजीर बागायतकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अक्षय यादव, तसेच मोहोळ येथील न्यायालयातील काही वकील मंडळी उपस्थित होती.
0 Comments