सिद्धेश्वर एक्सप्रेसला मोहोळ येथे थांबा द्या! या मागणीसाठी रावसाहेब
दानवे यांची 'प्रतीकात्मक तिरडी आंदोलन'
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ येथील रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर एक्सप्रेस ला थांबा द्या, या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिकात्मक तिरडी तयार करून खा. शरद पवार गटाचे तथा मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मोहोळ येथील रेल्वे स्थानकावर आंदोलन केले.
मोहोळ शहर व तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता, मोहोळ लोक संख्येच्या बाबतीत झपाट्याने वाढत असलेले शहर आहे. इथल्या नागरीकांना व व्यापारी बंधूंना मुंबई पुण्या सारख्या मोठ्या शहरांमध्ये जायचे झाल्यास सोलापूरला जावे लागते, त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे.
त्यांची गैरसोय टाळण्यासाठी म्हणून मोहोळ रेल्वे स्थानकावरती सिद्धेश्वर गाडीचा थांबा त्वरित द्यावा, अन्यथा दिल्लीतल्या रेल्वे भवनासमोर कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी तिरडी आंदोलनादरम्यान बोलताना दिला.
कोरोना काळापासून मोहोळ रेल्वे स्थानकावरती थांबणाऱ्या सिद्धेश्वर गाडीचा थांबा बंद करण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ यापूर्वी देखील मोहोळ रेल्वे स्थानक तसेच जंतर-मंतर मैदान दिल्ली या ठिकाणी मोहोळच्या रेल्वे थांबा संदर्भात आंदोलन करण्यात आले होते.
परंतु त्याची दखल न घेता एकाच तालुक्यात एकाच लोकसभा मतदार संघात माढा, जेऊर व केम या रेल्वे स्थानकावरती रेल्वेचा थांबा सुरू केलेला आहे, परंतु मोहोळकरांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. हे सबंध मोहोळ शहरवासीयांचे दुर्दैव आहे. या निर्णयाच्या विरोधात आज मोहोळ रेल्वे स्थानकावर ती तिरडी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भिम युवा प्रतिष्ठाणचे विनोद कांबळे, ज्योती क्रांती परिषदेचे प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर, मोहोळ विधानसभा कार्याध्यक्ष मंगेश पांढरे, मोहोळ शहर कार्याध्यक्ष आबासाहेब कांबळे, युवा नेते संतोष सोलनकर, कोळेगांवचे माजी सरपंच नामदेव केवळ, जितेंद्र अष्टुळ, सागर अष्टुळ, उमेश गोटे, सुलतान पटेल, दिग्विजय वस्त्रे, मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष संगिताताई पवार, वर्षा दुपारगुडे, ज्योती ननवरे, रवी थोरात, ईशान खरकदारी, संग्राम गरड, शशि सनगर, आल्ताप शेख, साहेब वाघमारे, जयपाल पवार, अतिश पाटील आदीजण उपस्थित होते.
0 Comments