ज्ञानाचा अंहकार सोडून आयुष्यभर विद्यार्थी रहा – मा. कृष्णकुमार गोयल
(कटूसत्य वृत्त):-जगाबरोबर जातो तो प्रगती करतो. त्यामुळे बुरसटलेल्या विचारांना थारा देऊन आपली अधोगती करून घेऊ नका. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा. काळानुसार येत असलेले नवनवीन ज्ञान ग्रहण करा. त्यासाठी आपल्या ज्ञानाचा अंहकार सोडून आयुष्यभर विद्यार्थी रहा असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले. दिनांक ९ ऑगस्ट, २०२३ रोजी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी येथे आयोजित क्रांती दिनानिमित्त पुस्तक प्रकाशन आणि विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर नव्या शैक्षणिक धोरणातील प्रचलित भारतीय ज्ञानप्रणालीचे महत्त्व लक्षात घेऊन महाविद्यालयातील प्राध्यापकांनी या विषयावर लिहिलेल्या शोधनिबंधाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अर्थशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि बँकिंग याविषयातील विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांचे पुस्तक आणि बेंगलोर येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय विशेष शिबिरातील विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाच्या पुस्तकाचे देखील आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक रमेश अवस्थी, मधुकर टिळेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. अर्जुन मुसमाडे, प्रा. अरुण शेलार, आयु.क्यू.ए.सी. चे प्रमुख प्रा. राजेंद्र लेले आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. राजेंद्र लेले यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment