कृषी सिंचनाच्या पाणीपट्टीचा जिझिया कर रद्द करा अन्यथा जनआंदोलन ऊभे करणार. प्रा सुहास पाटील..
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- कृषी सिंचनाच्या पाणी वापरावरील पाणीपट्टी जुन्या दरापेक्षा १२ पट जास्त असुन ती त्वरीत रद्द करावी असे निवेदन रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्स प्रा सुहास पाटील यांनी ऊपमुख्यमंत्री कार्यालयात दिले.तसेच जलनियमन महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांची भेट घेऊन पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याविषयीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवावा अशी मागणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे २३ नोव्हेंबर २०२२च्या पत्रानुसार दरवाढ मंजुरीचा निर्णय घेतला व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांचे ३० मार्च २०२२च्या पत्रानुसार महाराष्ट्रातील कृषी सिंचनाच्या पाणीपट्टीचे दरवाढ करून त्याची वसुली १जुलै २०२३ पासुन करण्यात यावी हा निर्णय घेण्यात आला.म्हणजे महाविकास आघाडी सरकारने पाणीपट्टी दरवाढ केली.त्याची वसुली शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात होणार असल्याचे दिसुन येते. कृषी सिंचनाच्या वापरकर्त्यासाठी खाजगी उपसा सिंचन योजना पाणीपट्टीवरील पाणीपट्टी आकार दरवाढ हेक्टरी १२ पटीने वाढविण्यात आला आहे. ऊस, केळी या नगदी पिकांसाठी जुना वार्षिक हंगाम पाणीपट्टी दर हेक्टरी १८३० रूपये असा होता. परंतु नवीन शासन निर्णयानुसार हेक्टरी २२ हजार ६८० रूपये एवढा झालेला आहे. फळबाग पिकांसाठी जुन्या दरानुसार हेक्टरी १४६४ रुपये पाणीपट्टी होती. त्याऐवजी नवीन शासन निर्णयानुसार फळबाग पिकांसाठी १७ हजार ६४ रुपये पाणीपट्टी करण्यात आलेली आहे. अन्नधान्य व इतर पिके यासाठी जुना वार्षिक हेक्टरी दर ३६६ असा होता. त्याऐवजी हेक्टरी ७ हजार २०० रुपये वार्षिक पाणीपट्टी दर झालेला आहे. एकंदरीतच नवीन वाढीव पाणीपट्टी आकारणी दर जवळ जवळ १२ पट वाढीव आहेत. नवीन दरानुसार पाणीपट्टी शेतकऱ्यांना भरणे कदापिही शक्य होणार नाही. शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत शेतातील पिकांसाठी जलमापक यंत्र बसवलेले नाहीत. असे असताना खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील पाणीपट्टी दरवाढ ही जिझीया करच आहे. तरी शासनाने लवकरात लवकर दरवाढ रद्द करून, जुन्याच निर्णयानुसार पाणीपट्टी आकारण्यात यावी.अन्यथा रयत क्रांती संघटना सर्व शेतकऱ्यांना सोबत घेत जनांदोलन उभे करणार असल्याचे प्रा सुहास पाटील यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment