परीक्षांचे वेळापत्रक आता महाविद्यालयेच ठरविणार; विद्यापीठाची पुरवणी परीक्षा १ सप्टेंबरपासून
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सत्र परीक्षांचे वेळापत्रक आता यापुढे विद्यापीठ नव्हे तर संलग्नित महाविद्यालयेच ठरविणार आहेत. परीक्षा घेणे व उत्तरपत्रिकांची तपासणीची जबाबदारीही त्या महाविद्यालयांवर असणार आहे. या निर्णयामुळे सत्रातील अभ्यासक्रम किती शिकवून झाला, विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत, याचा विचार होऊन वेळापत्रक अंतिम होईल. जेणेकरून पुन्हा त्यात बदल करण्याची नामुष्की ओढवणार नाही.
सत्र परीक्षा झाल्यापासून ३० दिवसांत निकाल जाहीर करणे विद्यापीठास बंधनकारक आहे. मात्र, निकालास ४५ दिवसांहून अधिक कालावधी लागल्यास त्याचे स्पष्टीकरण राज्यपालांना द्यावे लागते. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक त्यासाठी जबाबदार असतात.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, निकाल वेळेत जाहीर होऊन नवीन सत्र वेळेवर सुरु व्हावे म्हणून विद्यापीठ प्रशासनाने आता परीक्षांच्या नियोजनाची जबाबदारी महाविद्यालयांवरच सोपविली आहे. तृतीय वर्षांवरील परीक्षांचे नियोजन मात्र विद्यापीठाकडूनच होईल. सुटीचे दिवस सोडून अध्यापनाचा कालावधी ९० दिवस पूर्ण झाल्यावर सत्र परीक्षा घेतली जाते. आता आगामी सत्र परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहे.
दरम्यान, आता विद्यापीठातील सर्व अधिविभाग व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी केली जात आहे. दुसरीकडे संलग्नित ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांसाठीही हे धोरण लागू आहे. त्यानुसार त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. नवे कुलगुरू घेणार ‘ऑनस्क्रिन मूल्यमापन’चा निर्णय विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर व्हावेत म्हणून सध्या ऑनस्क्रिन मूल्यमापन पद्धत कार्यान्वित करण्यात आली आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्कॅनिंग सेंटरमध्ये सर्वच उत्तरपत्रिका स्कॅन करून संबंधित प्राध्यापकांना पाठवून त्या तपासून घेतल्या जातात. पण, आता प्रथम व द्वितीय वर्षांच्या परीक्षांचे नियोजन त्या त्या महाविद्यालयांकडे असल्याने ही पद्धत आता सुरु राहणार की बंद होणार, याचा निर्णय नवीन कुलगुरू घेणार आहेत. २८ ऑगस्टला मुलाखती होणार असून त्यात पाच जणांची नावे अंतिम होतील. त्यानंतर राज्यपाल त्यांच्यासोबत संवाद साधतील आणि सप्टेंबरमध्ये नवीन कुलगुरुंची निवड जाहीर होईल. प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडूनच मिळणार नव्या निर्णयानुसार प्रथम व द्वितीय वर्षांच्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक ठरविणे, त्याचे नियोजन व उत्तरपत्रिकांची तपासणीची जबाबदारी त्या त्या महाविद्यालयांवर असेल. त्यामुळे पेपर संकलित करून त्याचे गठ्ठे करून स्कॅन करणे आणि त्यानंतर प्राध्यापकांना शोधून त्यांना त्याची जबाबदारी देण्यात मोठा विलंब होतो. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षेच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण केले आहे. पण, परीक्षांची प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडूनच त्यांना पुरविली जाणार आहे. जेणेकरून त्यात पारदर्शकता राहील हा त्यामागील हेतू आहे.
पुरवणी परीक्षा १ सप्टेंबरपासून
सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या वतीने आता १ सप्टेंबरपासून पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणासाठी अडचण येणार नाही, हा त्यामागील हेतू आहे. जिल्ह्यातील जवळपास दहा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.
.png)
No comments:
Post a Comment