"वडाचीवाडी" च्या शेतकऱ्याच्या मुलाने घेतली गरुड भरारी...!
डॉ.तुकाराम म्हमाणे यांचा लोकनेते परिवाराने केला गौरव...!!
मोहोळ (कटूसत्य वृत्त): - शेतीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशाच्या मातीमध्ये हिरे घडवण्याची ताकद निश्चितपणे आहे. शेतीबरोबर नाळ जुळलेल्या शेतकऱ्याची पोरं विविध क्षेत्रांमध्ये अनेक शिखरं पादाक्रांत करतायेत. असंच एक शिखर सर केलयं....वडाचीवाडी (ता.मोहोळ) येथील एका शेतकऱ्याच्या (भारत म्हमाणे यांच्या) मुलानं...अनं अनगरच्या जावाईबापूंनी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुकाराम म्हमाणे या युवकाने आपलं उच्च शिक्षण पूर्ण करत एम.एस.सी. रसायनशास्त्र शिक्षण नांदेड विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावून पूर्ण केलं. हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुकारामचे सासरे गणेश पावले यांनी खूप मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.
याशिवाय देशभरातून घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं. आणि केंद्र सरकारची फेलोशिप घेऊन आपलं संशोधन सुद्धा या पठ्ठ्याने पूर्ण केलं. ग्रामीण भाग सुद्धा उच्च शिक्षणामध्ये कमी पडत नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यानंतर तुकारामने सी.एस.आय.आर-आय.आय.सी.टी हैदराबाद या विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली.
या यशाबद्दल माजी आमदार राजन पाटील यांनी कौतुक करून अनगर येथील बाबुराव अण्णा पाटील कला व विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक रसायनशास्त्र विभाग प्रमुख पदासाठी निवड केली.
निवडीनंतर वडाचीवाडी ग्रामस्थांमधून या सुपुत्राचे कौतुक होत आहे.
डॉ.तुकाराम भारत म्हमाणे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते डॉ. तुकाराम म्हमाणे यांचा पत्नी स्नेहल सहसत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आणि सचिव अजिंक्यराणा पाटील यांनीही म्हमाणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी गणेश पावले, पांडुरंग सुरवसे, पांडुरंग थिटे, उद्योगपती राम कदम, माजी सरपंच नारायण गुंड, हरी गुंड, पोलीस पाटील विठ्ठल थिटे आदी उपस्थित होते.
0 Comments