‘ सामाजिक बांधिलकी जपूया, नवउद्योजक घडवूया’
चंद्रनील सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांचा नवउपक्रम
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ८२ वा वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रनील सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सामाजिक बांधिलकी जोपसात सुशिक्षित तरूणांसाठी ‘सामाजिक बांधिलकी जपूया, नवउद्योजक घडवूया’ या उपक्रमाअंतर्गत भव्य लोन मेळाव्याचे आयोजन केले आहे.
उच्च शिक्षणानंतर आपला मुलगा नोकरीला लागेल, त्यातून आयुष्यातील अडचणी दूर होतील, अशी आशा प्रत्येक आई-वडिलांना असते. पण, शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी आणि नोकरीची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे तरूणांनी स्वत: उद्योजक व्हावे आणि आपल्या आई-वडिलांची स्वप्नपूर्ती करावी या हेतूने सीए बंदपट्टे यांनी हा लोन मेळावा आयोजित केला आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या मेळाव्यात पहिल्या टप्प्यात नावनोंदणी, दुसऱ्या टप्प्यात कागदपत्र पडताळणी आणि अंतिम टप्प्यात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या मेळाव्यासाठी नामांकित बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, मेळाव्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांविषयी संपूर्ण कल्पना दिली जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव दिला आहे, त्यांचे बॅंकेकडून तत्काळ कर्ज मंजुरीची प्रक्रिया केली जाईल, असा विश्वास आयोजक सीए सुशील बंदपट्टे यांनी व्यक्त केला आहे. तरूणांनी तरटी नाका परिसरातील मयूर फोटो स्टुडिओजवळील चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात नावनोंदणी करावी. त्यानंतर लघू, मध्यम उद्योगांसाठी ‘स्टार्टअप’मधून तरूणांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.
चौकट
(तरूणांनी नोकरी मागणारे नव्हे देणारे व्हावे)
तरुणांनी स्वयंरोजगारातून स्वतः उभे राहावे आणि शिवाय इतरांनाही रोजगार उपलब्ध करून त्यांच्या पायावर उभे व्हावे म्हणून चंद्रनील सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. तरूणांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे, त्यांनी स्टार्टअपच्या माध्यमातून स्वत:चा उद्योग सुरु करावा, या हेतूने हा मेळावा घेण्यात येणार असल्याचे सीए बंदपट्टे यांनी स्पष्ट केले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या मेळाव्याचे सर्व तरूणांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment