एसटी चालकाने मद्य प्राशन करून चालवली बस; सांगोला-स्वारगेट मार्गावरील घटना
सांगोला (कटूसत्य वृत्त):- 'एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास' असे म्हटले जाते. परंतु एसटी बसच्या चालकाने मद्य प्राशन करून बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 14 ऑगस्ट रोजी सांगोल्याहून पुण्याकडे निघालेल्या बसमध्ये घडली आहे.
वाहक व प्रवाशांना वेळीच हे लक्षात आल्याने त्यांनी बस थांबवून चालकास पोलिसांच्या स्वाधीन केले. बस चालक उत्तम बबन पाटील (रा. वाकीशिवणे, ता. सांगोला) या मद्यपी चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला एसटी बस आगारातून (एम. एच - १३, सी. यु - ६८९७) ही सांगोला ते स्वारगेट (पुणे) एसटी बस घेवून चालक उत्तम बबन पाटील आणि वाहक प्रदिप विश्वासराव राऊत असे दोघेजण जात होते.
१४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सांगोला आगारातून प्रवाशांना घेवून बस जात असताना वाढेगाव नाक्यावर चालक उत्तम पाटील याने चालत्या गाडीतून बाटलीतील पाणी प्याले. त्यानंतर बस पुढे घेवून जात असताना महूद रोडवरील पुलाजवळ गतीरोधकावर बस जोरात आदळल्याने बसमधील प्रवाशी ओरडून गाडी सावकाश चालवा असे म्हणाले.
त्यावेळी वाहक प्रदीप राऊत यांनी चालक उत्तम पाटील यांना गाडी सावकाश घ्या गतीरोधक आहेत, प्रवाशी ओरडत आहेत असे सांगितले. त्यानंतर चालक पाटील हे बस वाकडीतिकडी चालवू लागल्याने प्रवाशी घाबरून गेले. बसचा चालक पाटील हे दारू पिऊन बस चालवीत असल्याचा वाहक प्रदीप राऊत व प्रवाशांना संशय आला.
सर्वांनी चालकास गाडी रस्त्याच्या कडेला थांबवण्यास सांगीतले. त्यावेळी चालकाच्या तोंडाचा उग्र वास येत होता. त्यावेळी वाहक राऊत यांनी सदरचा प्रकार सांगोला आगारातील वरीष्ठ अधिकारी पारसे, कदम, बुरंजे, सुतार, पाटील यांना कळविले होते. त्यानंतर एस. टी चालक उत्तम बबन पाटील यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
त्या ठिकाणी पोलिसांनी उत्तम पाटील यास ब्रेथ अँनालायजर मशिनद्वारे चेक केले असता त्याने मद्य प्राशन केल्याने दिसून आले. याबाबत एसटी बसचे वाहक प्रदिप विश्वासराव राऊत यांनी बस चालक उत्तम बबन पाटील (रा. वाकीशिवणे, ता. सांगोला) या मद्यपी चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
.png)
No comments:
Post a Comment