दिव्यांगांना मोफत घरकुल, पिवळे रेशन कार्ड आणि उदरनिर्वाह भत्त्यात वाढ करा!*
मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यात एक हजार दिव्यांगांचा मोर्चा धडकणार.- कॉ. नरसय्या आडम मास्तर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत घरकुल, पिवळे रेशन कार्ड आणि दरमहा पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा या आणि इतर मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. संबंधित अधिकारी आणि शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा करूनदेखील दिव्यांग लाभार्थ्यांना याचा लाभ मिळू शकला नाही. म्हणून आता शासन आपल्या दारी या अभियानाअंतर्गत पंढरपूर येथे येणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांची भेट घेऊन लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेचे पदाधिकारी असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन निवेदन सादर करणार असल्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केली.
दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात बुधवारी 23 ऑगस्ट रोजी लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. याप्रसंगी आडम मास्तर बोलत होते. अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्या घेऊन सोलापूरहुन एक हजार दिव्यांग बांधवांचा मोर्चा येत्या दहा सप्टेंबरला थेट पंढरपूरकडे रवाना होणार असल्याचा इशाराही आडम यांनी सभेला संबोधित करताना दिला. परवानगी मिळो अथवा न मिळो दिव्यांग लाभार्थी आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी कसल्याही परिस्थितीत पंढरपूरकडे रवाना होतील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडतील असे आडम यांनी ठणकावून सांगितले. प्रारंभी संघटनेचे सचिव इलियास सिद्दिकी यांनी आपल्या प्रस्तावनेत दिव्यांगांना पिवळे रेशन कार्ड मिळावे,शासनाने दिव्यांगांसाठी मोफत स्वतंत्र घरकुल योजना राबवावी, दिव्यांगांच्या उदरनिर्वाह भत्त्यात वाढ करावी, 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रागतिक पक्षाच्या मेळाव्यात दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हावे आणि संघटनात्मक प्रश्न आदी विषयांची मांडणी केली. दरम्यान संघटनेचे कोषाध्यक्ष अकील शेख यांनी संघटनेचा जमा खर्च सभासदांसमोर मांडला. याला सर्वांनी हात उंच करून एकमताने मंजुरी दिली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सीटूचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ शेख मेजर यांनीही दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. रे नगर प्रमाणेच दिव्यांग बांधवांना येत्या काळात आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली घरकुल योजना राबवण्यात येईल असे आश्वासन युसुफ मेजर यांनी दिले. या सभेत सुनिता अंजीखाने यांची संघटनेच्या नूतन अध्यक्षपदी तर अनिल मठपती यांची सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आडम मास्तर आणि लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेवर आमचा विश्वास असून आम्ही सदैव संघटनेच्या सोबत राहू अशी ग्वाही उपस्थितानी दिली. याप्रसंगी मंचावर संघटनेचे युसुफ शेख मेजर, संघटनेच्या अध्यक्षा सुनीता जिखाने, उपाध्यक्ष सुशील गुजले,उपाध्यक्ष आसिफ पठाण, सरचिटणीस इलियास सिद्दिकी सहसचिव प्रभाकर कलशेट्टी, इब्राहिम मुल्ला,कोषाध्यक्ष अकील शेख,सदस्य सुरेखा गडदे, अमिना शेख आणि अनिल मठपती उपस्थित होते. याप्रसंगी संघटनेचे सभासद सव्वालाखे, सुधीर चिकणे आदींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सभेचे सूत्रसंचालन इलियास सिद्दिकी यांनी केले तर आभार सुनिता अंजीखाने यांनी मानले.या सभेला तीनशेपेक्षा जास्त सभासद उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment