बार्शीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे शानदार उदघाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 10, 2022

बार्शीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे शानदार उदघाटन

 बार्शीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे शानदार उदघाटन 

बार्शी (कटूसत्य वृत्त):- आजच्या काळात शेती हे मोठे आव्हान झाले असून पारंपारिक शेती करून आता चालणार नाही. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवतंत्रज्ञान शिकायला मिळते. शेतीमधील नवतंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपली उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. रासायनिक खतांचा कमी कमी कसा वापर करता येईल यादृष्टीकोनातूनही शेतकऱ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. 


येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने देशाच्या स्वातंत्र्याचा व बाजार समितीच्या अमृतमहोत्वसानिमीत्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते ऑनलाईन बोलत होते. 

विखे-पाटील म्हणाले, हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. शेती आव्हानात्मक होत आहे. त्यामुळे हवामान बदलाचा परिणाम, त्याला कसे सामोरे जायचे, काय उपाययोजना करायच्या, शेती करण्याच्या पध्दतीने त्यादृष्टीने बदल करावे लागतील. निर्यातक्षम शेतीला संधी आहे. युवा शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाजार समितीने भव्य स्वरूपात आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे कौतुक केले. 


जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर म्हणाले, विकास हा तंत्रज्ञानावर आधारीत आहे. त्यामुळे प्रगत तंत्रज्ञान लोकापर्यंत पोहोचले पाहिजे. हे काम अशा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले. 

आ. राजेंद्र राऊत म्हणाले, बाजार समितीत सत्ता आल्यानंतर सेसचे उत्पन्न सुमारे २ कोटी होते. ते सुमारे १२ कोटी रूपयांवर गेले.  त्यातून विकासकामे साकारली. सत्तेच्या माध्यमातून बाजार समितीचा कायापालट केला. शेतकरी व बाजार समितीतील सर्व घटकांना चांगल्या सुविधा व शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. 


जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे म्हणाले, राज्यातील बाजार समित्यांपैकी पहिल्या २५ बाजार समितीत बार्शी बाजार समितीचा समावेश आहे. सभापती रणवीर राऊत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजार समितीची चांगली प्रगती साधली आहे. भविष्यात राज्यात अव्वल क्रमांक पटकावेल असा विश्वास वाटतो. प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होईल. बाजार समितीने असेच लोकोपयोगी व शेतकरी हिताचे उपक्रम राबवावेत 


जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले, जिल्हयातील हे पहिले मोठे प्रदर्शन आहे. शेतकऱ्यांसाठी ही पर्वणी असून शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. प्रदर्शनस्थळी सुध्दा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. 


प्रास्ताविकात सभापती रणवीर राऊत म्हणाले, शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम करत असताना बाजार समितीच्या माध्यमातून बार्शी सह वैराग उपबाजारात शेतकऱ्यांसाठी विविध पायाभूत सुविधांची निर्मीती केली आहे. सर्व संचालकाच्या सहकार्यामुळे ३२ कोटी रूपयांची विकासकामे करू शकलो. ई-नाम मध्ये राज्यातील ६० बाजार समित्यांमध्ये बार्शी बाजार समितीचा ५ वा क्रमांक असल्याचे अभिमानाने नमूद केले. शेतकऱ्यांपर्यंत शेतीतील प्रगत तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. 


यावेळी बाजार समितीत सर्वाधिक सेस भरणारे व्यापारी, सर्वाधिक श्रम करणारे हमाल तोलार, मुनिम यांचा मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. 

यावेळी विखे-पाटील यांनी कृषी महोत्सवाचे ऑनलाईन पध्दतीने तर प्रमुख मान्यवरांनी श्री भगवंताच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन उदघाटन केले. 


यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे उपसभापती झुंबर जाधव, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, पं.स.माजी सभापती अनिल डिसले, बाजार समितीचे संचालक यांच्यासह व्यापारी दिलीप गांधी, सचिन मडके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन निता देव यांनी केले. आभार संदीप मिरगणे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages