शहाजी बापूंच्या सांगोल्यात सापडले दारुंचे 'खोके', पोलिसांची कारवाई एकदम 'ओक्के'

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 'काय झाडी, काय डोंगर आणि हॉटेल, सगळं ओक्केमध्ये आहे', असा डायलॉग आठवला की आपल्या डोळ्यांसमोर लगेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा चेहरा उभा राहतो.राज्याच्या राजकारणात दोन महिन्यांपूर्वी प्रचंड घडामोडी घडल्या. महाराष्ट्रात सत्तांतर घडलं. या सत्तांतरमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचादेखील सहभाग होता. शहाजी बापू यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला नाकारलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ पकडली.
महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत शहाजी बापू पाटील हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. यादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपकडून प्रत्येक आमदाराला 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे '50 खोके, एकदम ओके', असं शिंदे गटाच्या आमदारांना डिवचण्यासाठी एक ब्रीदवाक्यच विरोधकांचं झालं आहे. बैलपोळ्याच्या दिवशी हे ब्रीद वाक्य अनेक शेतकऱ्यांनी बैलांवर लिहिलं होतं.
त्यामुळे खोके हा शब्द आणि शिंदे गट यांचा वारंवार संबध जोडला जातोय. आता देखील सांगोल्यात दारुचे अनेक अवैध भरलेले खोके सापडले आहेत. त्यामुळे शहाजी बापूंच्या सांगोल्यात सापडले दारूचे खोके, पोलिसांची कारवाई एकदम ओक्के, अशी चर्चा सुरु झाली आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे.
उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गार्डी गायगव्हण येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान पोलिसांच्या कारवाईचं नागरिकांकडून कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सांगोला पोलिसांनी अवैध दारू साठा विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 14 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या टॅगो कंपनीच्या सुमारे दोन हजार दारूच्या बाटल्या (२१० बॉक्स) जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment