बापूसाहेबांनी माणदेशाला ज्ञानदेश करण्याचं काम केलं- डॉ. प्राचार्य यशवंत पाटणे
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके ४१ वा स्मृती समारोह सोहळा संपन्न

सांगोला (कटूसत्य वृत्त):- जन्म आणि मृत्यू या मधले अंतर म्हणजे आयुष्य.हे आयुष्य आपण कोणती विचार मुल्ये घेऊन जगतो यावर आपल्या जगण्याचे श्रेष्ठत्व ठरते. जिवंत राहण्यासाठी अन्न लागते पण सन्मानाने जिवंत राहण्यासाठी ज्ञान आणि विचार लागतो.ज्ञान व विचार या मातीला देण्यासाठी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी अहोरात्र कष्ट घेतले.सांगोल्या सारख्या दुष्काळी भागाला ज्ञानाचा सुकाळ आणून ठेवला. माणदेश भागाला ज्ञानदेश करण्याचे काम बापूसाहेबांनी केले. असे प्रतिपादन सातारा येथील प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.

सांगोला येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४१ व्या स्मृति सांगता समारंभात प्राचार्य पाटणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके,प्राचार्य भीमाशंकर पैलवान हे उपस्थित होते.सर्वप्रथम कै. बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यामंदिर परिवारातील विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकासाचा आलेख कशा पद्धतीने उंचावत आहे हे स्पष्ट केले. प्रा. धनाजी चव्हाण प्रमुख पाहुणे यशवंत पाटणे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक निवड प्रक्रियेचं निवेदन मिलिंद फाळके यांनी केले.यावर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगे येथील संजय रामचंद्र जवंजाळ यांना प्रधान करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची मूर्ती, शाल,श्रीफळ, सन्मानपत्र व रोख अकरा हजार रुपये देऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.यावेळी बोलताना संजय जवंजाळ म्हणाले की, मातृभूमीत मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आईने पाठीवरती दिलेली कौतुकाची थाप आहे.मला अनेक पुरस्कार मिळाले परंतु हा पुरस्कार मला मिळाल्याने माझ्या कार्याचे सार्थक झाल्याचे मी समजतो.
पुढे बोलताना यशवंत पाटणे म्हणाले की मूर्ती कुठे असते ती दगडातच असते,सूर कुठे असतात ते बासरीतच असतात, दगडाला कोरावं लागतं बासरीला फुंकावं लागतं त्याच पद्धतीने तुमच्या मध्ये चैतन्य लपले आहे ते चैतन्य या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून फुलवण्याचं काम होत आहे.तुम्ही सर्व विद्यार्थी भाग्यवान आहात, ज्या शाळेची उभारणी बापूसाहेबांनी केली आहे त्या शाळेत तुम्ही शिक्षण घेत आहात.आज संविधानालाही तडे जात आहेत अशी अवस्था समाजात निर्माण होत आहे, परंतु त्याकाळी राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक संस्थांमध्ये एक वेगळा आदर्श बापूसाहेबांनी घालून दिला आहे.तोच आदर्श बापूसाहेबांची पुढची पिढी तितक्याच नम्रतेने व तत्त्वाने पुढे नेत आहे ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे.बापूसाहेबांचा स्मृति महोत्सव साजरा करत असताना आपण बापूसाहेबांच्या कार्यकर्तुत्वाचे चिंतन करायला हवे.सुंदर फुले बघायचे असतील तर साताऱ्याच्या कास पठार कडे जावे लागते,कोरलेली शिल्प बघायचे असतील तर अजिंठा वेरूळ ला जावे लागते आणि मूर्तीमंत विद्यार्थ्यांची शिल्प बघायचे असेल तर विद्यामंदिर या संस्थेत यावे लागते. यावेळी त्यांनी बापूसाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा उल्लेख करीत उपस्थितीतांना अंतर्मुख केले.. अध्यक्षीय मनोगतातून प्रा. प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की आजचे वक्ते प्राचार्य यशवंत पाटणे यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळाले. या विचारातून आमचे सर्व विद्यार्थी निश्चितपणे स्फूर्ती व प्रेरणा घेतील याचा मला विश्वास वाटतो.बापूसाहेबांनी दाखवलेल्या वाटेने ही संस्था पुढे वाटचाल करत आहे.बापूसाहेबांची तत्व अतिशय प्रामाणिकपणे सांभाळत आम्ही संस्थेचा उत्कर्ष करत आहोत. आपणा सर्वांच्या सहकार्याने या संस्थेचा उत्कर्ष या पुढील काळात ही वाढत राहील असा विश्वास मला वाटतो. यावेळी कै. बापू गोविंद खडतरे यांच्या स्मरणार्थ दादा बापू खडतरे व अनुराधा दादा खडतरे यांच्याकडून २५ हजार रुपयांचा धनादेश संस्थेला देण्यात आला.कै. चंद्रकांत बाबूराव उर्फ आप्पा रायचूरे यांच्या स्मरणार्थ प्रशांत चंद्रकांत रायचुरे व परिवार यांच्याकडून २५ हजार रुपयांचा धनादेश संस्थेला देण्यात आला. कै. गयाबाई मार्तंड ढोले यांच्या स्मरणार्थ सोमनाथ औदुंबर ढोले गुरुजी व परिवार यांच्याकडून २५ हजार रुपयांचा धनादेश संस्थेला प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने सर्व देणगीदारांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील मुख्याध्यापक यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अमोल गायकवाड यांचा, जिल्हास्तरीय कृतिशील लेखक शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील जवंजाळ व सांगोला तालुका विज्ञान प्रदर्शनातील प्रथम क्रमांक प्राप्त सोमनाथ सपाटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रंगभरण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर व प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर आभार उपप्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी मानले. या कार्यक्रमास सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व पदाधिकारी,कार्यकारणी सदस्य,सांगोला शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, साहित्यिक, झपके कुटुंबीय,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,पत्रकार, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय स्टाफ ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment