अष्टविनायकांपैकी श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणीची द्वार यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली

थेऊर (प्रविण शेंडगे):- अष्टविनायकांपैकी श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणीची द्वार यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.भाद्रपदी यात्रेला २८ औगस्ट रोजी सुरुवात झाली आणि श्री चिंतामणीच्या बहिणी असलेल्या ठिकाणी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कोरेगांव मूळ येथील आसराई देवीला जाऊन आमंत्रित करण्यात आले. द्वितीयेला म्हातोबाची आळंदी येथील ओसराई देवी, तृतीयेला मांजरी येथील मांजराईदेवी आणि चतुर्थीीला थेऊर येथील महातारी आई देवी अशी द्वारयात्रा संपन्न झाली. त्यामुळे श्रींचे विलोभनीय रूप पहाण्यासाठी अनेक भाविकांनी थेऊरला मोठी गर्दी केली.
पंचमीला पहाटे मटकीच्या प्रसादाने उपवास सोडून कार्यक्रमाची सांगता होते. चतुर्थीला पिरंगुटकर देव मंडळी आणि प्रकाश महाराज देव हिंजवडीकर यांच्या महापूजा झाल्या. सायंकाळी श्रींना भरजरी महापोषाख परिधान करण्यात आला. रात्री परंपरेनुसार श्रींचा छबिना काढण्यात आला. त्यानंतर शोभेची आताषबाजी करणात आली. पहाटेपर्यंत सरगुरू मोरया गोसावी रचित पदांची आरती करण्यात आली. त्यामध्ये टिप-यांचा खेळ झाला. त्यामुळे रात्रभर मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आला नाही. पहाटे श्रींची दृष्ट काढण्यात आली. त्यानंतर थोडा वेळ श्रींच्या गाभा-याचे दरवाजे बंद करून परत उघडण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मटकीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
परंपरेप्रमाणे हा कार्यक्रम पिरंगुटकर देव मंडळी श्रीक्षेत्र थेऊर येथे येऊन साजरा करतात. यामध्ये अरुण देव महाराज, गणेश देव, पुरुषोत्तम देव, नारायण देव, अशोक देव, शशांक देव आदि मंडळी सहकुटुंब उपस्थित होती. या भाद्रपदी महोत्सवाच्या सर्व व्यवस्थेवर चिंचवड देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. आनंद महाराज तांबे व व्यवस्थापक मंगलमुर्ती पोफळे हे लक्ष ठेऊन होते. सायंकाळी याठिकाणी श्री चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळाचे भजन पार पडले यावेळी अनेक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment