MIM ला सोलापूरात मोठं खिंडार; तौफिक शेखसह 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 12, 2022

MIM ला सोलापूरात मोठं खिंडार; तौफिक शेखसह 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

MIM ला सोलापूरात मोठं खिंडार; तौफिक शेखसह 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश


                सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत MIM पक्षाच्या 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तौफिक शेख, तस्लीम शेख, नुतन गायकवाड, पुनम बनसोडे, वाहिदाबानो शेख, शहाजीदा शेख हे MIM नगरसेवक आज राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

                एमआयएमचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह पाच नगरसेविकांनी शुक्रवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मागील महापालिका निवडणुकीत एमआयएमचे एकूण नऊ नगरसेवक निवडून आले होते.

                राष्ट्रवादी प्रवेशामुळे MIM ला सोलापुरात मोठे खिंडार पडलं आहे. MIM चे नेते आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत 6 नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. तौफिक शेख हे सोलापूरमधील MIM चे मातब्बर नेते असून कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. तौफिक शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

                राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयएमचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या पुढाकाराने वाहिदाबी शेख, तस्लिम शेख, नूतन गायकवाड, पूनम बनसोडे, शाजीदाबानो शेख या नगरसेवकांनी आणि रिपाईंचे महाअध्यक्ष प्रमोद गायकवाड तसेच द. सोलापूर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष नुरुद्दिन मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

                यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना जयंतराव पाटील म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून हा पक्षप्रवेश लांबला होता. मात्र निवडणुका लागल्या आणि सत्ता गेली त्यामुळे पक्षप्रवेश लांबला. अलिकडे सत्तेच्या भोवती रिंगण घालण्यासाठीच काही जण राजकारण करतात. मात्र तौफिक शेख यांचा पक्षप्रवेश जरा वेगळा आहे. सत्ता नसताना हा प्रवेश झाला आहे. त्यांच्या प्रवेशाने आमची ताकद द्विगुणित झाली आहे."

                तसेच सोलापूर शहरात आमची ताकद आता वाढली असून त्यामुळे येणाऱ्या मनपा निवडणुकीत ताकदीने लढू आणि मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

                मागील ५-६ वर्षांपासून राज्यात विचित्र परिस्थिती निर्माण केली जात आहे. मात्र दिवस येतात जातात. प्रतिकूल दिवस कसे पलटवून लावायचे असतात हे आदरणीय पवार साहेबांनी देशाला दाखवले आहे. आमच्या पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळतो, कुणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत असतो. आपल्या मदतीने पक्षाला आणि पक्षामुळे आपल्याला एक मोठी ताकद मिळेल याबाबत माझ्या मनात दुमत नाही, असे जयंतराव पाटील म्हणाले.

                राज्यातील अनेक लोक आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आहेत. सत्तेत आहे की नाही याचा लोक विचार करत नाहीत. आपण जे काम केले त्या कामाला लोकांची साथ आहे, असे ते म्हणाले.

                आज शपथविधीला चार दिवस झाले, मात्र राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झालेले नाही. आधी मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता, आता खातेवाटप होत नाही. त्यामुळे अंतर्गत धुसफूस किती आहे हे लोकांना लक्षात येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी अडचण ओढावली आहे. ते स्वतःच म्हणत होते की कोणत्या पेचप्रसंगात येऊन अडकलो आहे, असा टोला जयंतराव पाटील यांनी लगावला.

                आज महागाई प्रचंड वाढली आहे. सरकारने प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला आहे. आधी काय घालतो यावर जीएसटी होता, आता काय खातो त्यावरही जीएसटी आहे. आपली कमाई वाढली नाही, मात्र रुपयाने निच्चांक गाठला आहे. देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे याची झळ थेट सामान्य जनतेला बसत आहे. या सगळ्या गोष्टींवर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले.

                यावेळी अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष ऍड.मोहम्मद खान पठाण, अल्पसंख्याक सेल प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुऱ्हाण, सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव, निरीक्षक शेखर माने, मनोहर सपाटे, शफी इनामदार, महेश गादेकर, यु एन बेरिया, नलिनी चंदेले, संतोष पवार, शंकर पाटील, विद्याताई लोळगे, किसन जाधव, नागेश गायकवाड, दिलीप भाऊ कोल्हे, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, जुबेर बागवान, इब्राहीम कुरेशी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages