आबांसाहेबांची प्रेरणा व आदर्श घेवूनच मी आमदार झालो - आम निलेश लंके

सांगोला (कटुसत्य वृत्त):- स्व.आबासाहेबांनी निस्वार्थी काम केले असून गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम आबासाहेबांनी केले. आबांनी जीवनात गोरगरिबांचे आर्शिवाद कमाविले असून आबांची प्रेरणा घेऊनच मी आमदार झालो आहे.आबासाहेबांची प्रेरणा व आदर्श घेऊनच मी काम करत असल्याचे आ.निलेश लंके यांनी सांगितले.
शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते व समस्त शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांचे दैवत स्व.भाई गणपतराव देशमुख यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन काल शनिवार दि.30 जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी व संकल्प करून संपन्न झाला. पुण्यस्मरण दिनानिमित्त स्व.भाई गणपतराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी आ.जयंत पाटील, आ.सुमनताई पाटील, आ.प्रशांत परिचारक, आ.समाधान आवताडे, आ.यशवंततात्या माने, आ.गोपीचद पडळकर, माजी आमदार रामहरी रूपनवर, माजी आ.राजन पाटील, बळीरामकाका साठे, भगिरथ भालके, अभिजीत पाटील यांच्यासह जिल्हयासह राज्यातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांच्यासह शेकापक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आ.निलेश लंके बोलत होते.
त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मी काम करत आहे. आबासाहेबांनी माणसांत देव पाहिला असून स्वत:साठी काहीही केले नाही. आबांच्या स्मृती आजही आपल्यात असून त्यांच्या सोबत काम करता आले नाही ही आजही मनात खंत असल्याचे सांगत आबासाहेबांच्या अभिवादन स्थळावर मला एक वेगळी ऊर्जा आणि एनर्जी मिळाली आहे. स्व.आबासाहेबाच्या सहवासात काम करायला संधी मिळाली नसली तरी स्मृतीस्थळावरुन स्व.आबांना अभिवादन करुन सांगोला तालुक्यातून त्यांची प्रेरणा घेवून जाणार असून त्यांच्या पध्दतीचे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी पालकमंत्री आ.दत्तात्रय भरणे म्हणाले, स्व.आबांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. आबांचे वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळाले. त्यांनी केलेली मांडणी, त्यांनी केलेले काम व कार्य मला डोळ्याने पाहता, वाचता आले हे माझे नशीब आहे. स्व.आबांनी राज्याच्या राजकारणात वेगळे काम केले आहे. इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखे आबांचे काम असून पालकमंत्री असताना मला अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या. कोरोना काळात सांगोल्यात बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीस अधिकारी उपस्थित राहतील असा माझा अंदाज होता. परंतु या बैठकीस आमदार नसताना देखील आबासाहेब उपस्थित राहिले व आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले हे कधीही मी विसरू शकणार नाही. एखादी शासकीय योजना आबासाहेबांच्या नावे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि या पुढील काळात आम्ही सर्व जण देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे राहू असा विश्वास देत स्व.आबांचा आदर्श घेऊन वाटचाल करू असे सांगत आबांना श्रध्दांजली वाहिली.
आ.समाधान आवताडे म्हणाले की, दिनदलीत, कष्टकरी, शेतकर्यांच्या पाठीमागे आबा सदैव उभे राहिले आहेत. आबांनी राजकारणात समाजकारण कसे केले. हे पाहत मी राजकारणात आलो असून आबांचे विचार रुजविणे ही काळाची गरज आहे. विधानसभेत आबांचा पुतळा होण्यासाठी आम्ही ठामपणे पाठपुरावा करू असे सांगत आबांनी पाण्यासाठी मोठी चळवळ उभी केली होती असे सांगत सांगोला तालुक्यासह मंगळवेढा तालुक्यामध्येही पाणी येण्यामध्ये स्व.आबांचे फार मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.वैभव नाईकवाडी यावेळी म्हणाले, पाण्यांच्या प्रश्नांसंदर्भात नागनाथअण्णा नाईकवाडी आणि स्व.गणपतराव देशमुख यांनी तेरा दुष्काळी तालुक्यासाठी कृष्णा खोर्याचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी खूप संघर्ष केला आहे. संघर्षावेळी लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्याचे काम आबांनी केले होते. आबांच्या प्रयत्नामुळे दुष्काळी भागात पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या आहेत व काही पूणर्र्त्वास आल्या आहेत. स्व.आबाासाहेबांचे काम आदर्शवत असून लोकप्रतिनिधी कसे असावेत यासाठी आबा आदर्श आहेत. त्यांचे काम पिढ्यांनपिढ्या न विसरण्यासारखे असून आबासाहेबांच्या स्मृती पावलोपावली जाणवत आहेत. आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने धडपडणे हीच खरी श्रद्धांजली असून त्यांच्या दाखवलेल्या मार्गाने आपण सर्वजण वाटचाल करूया असे आवाहन केले
माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, 54 वर्षापेक्षा जास्त काळ आबासाहेबांनी सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. तालुक्यातील प्रश्न जागेवर सोडण्यासाठी आबांनी प्रयत्न केले आहेत. बागा वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान देता येत नव्हते. परंतु आबासाहेबांच्या अभ्यासपुर्ण मांडणीमुळे व मागणीमुळे बागा वाचविण्यासाठी अनुदान मिळाले.मुलगामी योजनांचे प्रेरणास्त्रोत म्हणून आबासाहेबांकडे पाहिले जात होते. दुष्काळी भागात आबासाहेबांनी सदैव काम केले असुन दुष्काळ पुसण्याचे काम आबासाहेबांनी केले असून आबासाहेबांमुळे अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असल्याचे सांगत श्रध्दांजली वाहिली.
यावेळी चेअरमन अभिजीत आबा पाटील म्हणाले, आबासाहेब हे राज्यासह सोलापूर जिल्हा व सांगोल्याचे भूषण होते. स्व.आबासाहेबांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला काम करण्याची प्रेरणा मिळते.सांगोला तालुक्यातील शिवणे साखर कारखान्यांमध्ये चेअरमन म्हणून काम करत असताना आबासाहेबांनी तालुक्यासाठी केलेले कार्य जवळून पाहता येत आहे असे सांगत सोलापूर-कोल्हापूर या राष्ट्रीय मार्गाला आबासाहेबांचे नाव द्यावे अशी मागणी केली.
यावेळी बाळासाहेब काटकर, सुरज बनसोडे, विवेक कोकरे, बाळासाहेब थोरवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांचे स्वागत डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले तर सर्वांचे आभार श्री.चंद्रकांतदादा देशमुख यांनी मानले.
No comments:
Post a Comment