कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्प सहकार कारखाना पुनर्जीवित करा- आमदार अतुल बेनके

मुंबई (नासिकेत पानसरे):- जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी उभा केलेला व सध्या बंद असलेला कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्प सहकार कारखाना त्वरीत पुनर्जीवित करून सुरू करावा अशी मागणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत केली.
भाग क्र. १९०, पान. ११८ च्या चर्चेवर बोलताना आमदार अतुल बेनके बोलत होते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्प सहकार कारखाना पुनर्जीवित करण्यासाठी बैठक घेऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सहकार खात्याकडून ४ कोटी तर, उर्वरित ७ ते ८ कोटी निधी केंद्र शासनाच्या आदिवासी विभागातून उभा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सध्या शिंदे- फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून सदर बंद असलेला कारखाना त्वरित पुनर्जीवित करून सुरू करावा अशी मागणी यावेळी आमदार बेनके यांनी केली.
याविषयावर बोलताना बेनके म्हणाले की, ' जुन्नर या माझ्या मतदारसंघात आदिवासी बहुल विभाग आहे. सध्या अतिवृष्टीने एकमेव भाताच्या पिकेचे नुकसान झाले आहे. दुसरे वार्षिक पीक , हिरडा पीक आदिवासी शेतकरी घेत असतात. या पिकासाठी पूर्वी शबरी महामंडळाकडून हिरडा खरेदी केली जायची.पण, हे महामंडळ तोट्यात गेल्यामुळे हिरडा खरेदी बंद केली. आता खाजगी व्यापारी हिरडा खरेदीसाठी शेतकऱ्यांची लूट करतात. बाजारभाव पाडतात त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तरी, शासनाने तज्ज्ञ माणसांची व तज्ज्ञ आदिवासी शेतकऱ्यांची बैठक घेऊन हिरडा खरेदीसाठी धोरण आखावे असेही आमदार अतुल बेनके म्हणाले.
No comments:
Post a Comment