खरी शिवसेना असेल तर भाजपाची युती तोडण्याचे धाडस करणार का..?

मुंबई, (नासिकेत पानसरे):- राज्यात घडविलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा करीत आहेत.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा नेमका तोच धागा पकडून, मुख्यमंत्री 'खऱ्या' शिवसेनेचे असतील, तर भाजप सोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का, अशी विचारणा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
जेपी नड्डा म्हणालेत की, देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील. कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असा दावा जेपी नड्डा यांनी केला होता. यानंतर, भाजपवर सडकून टीका केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री 'खऱ्या' शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.
प्रादेशिक पक्ष राज्यांतर्गत अस्मिता जपण्याचे काम करत असतात. त्यांना संपवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर केली आहे. हा छुपा अजेंडा सत्तेत आल्यापासून भाजप राबवत आहेच... तरी आता उघडपणे बोलण्यापर्यंत भाजप अध्यक्षांची मजल गेली आहे. मुख्यमंत्री जर 'खऱ्या' शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा निषेध करत आपल्या पक्षाची अस्मिता जपण्यासाठी भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत ते आता दाखवणार का?, अशी थेट विचारणा करीत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे.
एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार?
नड्डा जे बोलले ते वक्तव्य भविष्यात भाजपसाठीच मोठा "खड्डा" ठरेल .त्यांना वाटते तितकी सोपी ही गोष्ट नाही.या देशात हुकूमशाही नाही तुम्हीं कितीही फडफड केली तरी संविधानाला धक्का लाऊ शकणार नाही. हे लक्षात ठेवा, अशी टिका अमोल मिटकरींनी केली आहे.राज्यपालांना तसं म्हणायचं नव्हतं, नड्डाजींना तसं म्हणायचं नव्हतं, एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, असा खोचक सवालही मिटकरींनी केला आहे.
No comments:
Post a Comment