प्राणीमित्र यांच्यासह गोरक्षक यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईद अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक ०५/०७/२०२२ रोजी १७.१० वा. ते १८.०० वा. चे दरम्यान शांतता समिती सदस्य, मुस्लीम बांधव, सोलापूर महानगर पालिकेडील अधिकारी, पशु संवर्धन अधिकारी, प्राणीमित्र यांच्यासह गोरक्षक यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकीची प्रस्तावना डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. दि.१०/०७/२०२२ रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद असे दोन मोठे उत्सव एकाच दिवशी साजरा होणार आहेत. स्वयंघोषित प्राणी मित्र / गोरक्षक यांनी जनावरांची वाहने अडविणे,त्यांच्याकडे चौकशी करणे असे कोणतेही कृत्य करू नयेत. शहरातील प्रवेश मार्गावर एकुण ०८ ठिकणी पोलीसांकडुन नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. गोहत्या करणे, गोमांसची वाहतुक करणे कायद्याने प्रतिबंध आहे, प्राण्यांना निर्दयतेने वागवू नये या कायद्याचे पालन करावे. सोशल मिडीयाचा गैरवापर टाळावा, चुकीचे संदेश, मेसेजेस, पोस्ट फॉरवर्ड न करता तात्काळ डिलीट करावेत. धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेजेस, पोस्ट यावर प्रतिक्रिया न देता त्याबाबत सजग राहुन त्याची माहिती तात्काळ पोलीसांना द्यावी असे आवाहन केले. त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समीती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर पोलीस आयुक्त सो यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडी-अडचणींचे निरसण केले. दोन्ही सण एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी ही गणपती आणि मोहरम एकत्र आले होते त्यामुळे कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. सोलापूर शहर उत्सव प्रिय आहे, उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळा कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, अशा इसमांची गय केली जाणार नाही. कठोर शासन केले जाईल याची नोंद घ्यावी. इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेतली पाहीजे. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, पोलीस २४ x ७ उपलब्ध आहेत. शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांनी दिली पाहीजे. नमाजाच्या ठिकाणी स्वयंसेवक नेमले पाहिजेत. सोशल मिडीयावर येणाऱ्या चुकीच्या संदेशाचे समर्थन करता कामा नये तसेच त्यावरुन अफवा पसरवु नयेत याची खबरदारी घेतली पाहिजे. आपली वर्तणूक चांगली ठेवली पाहिजे, पोलीस आपल्या सेवेसाठी आहेत. बकरी ईदच्या अनुषंगाने लवकरच पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सुचना पत्रक जाहीर होईल इत्यादी सुचना देवून बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment