'हर घर झेंडा' या उपक्रमात प्रत्येक नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

- हर घर झेंडा हा उपक्रम दिनांक 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविला जाणार
- या उपक्रमासाठी साधारणत: साडेसात लाख तिरंगा ध्वज उपलब्ध करण्याचे नियोजन
- नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 75 फूट उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्याचे नियोजन
- या उपक्रमाअंतर्गत सोलापूर महापालिकेने ग्रीन बेल्ट व स्वातंत्र्य बागेची निर्मिती करावी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासनाच्या निर्देशानुसार आजादी का अमृत महोत्सव जिल्ह्यात दिनांक 12 मार्च 2021 ते दिनांक 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध कार्यक्रम व उपक्रमाव्दारे आयोजित केला जात आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर झेंडा हा उपक्रम राबविला जाणार असून या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा व आपल्या घरावर तिरंगा ह्या आपल्या राष्ट्रध्वजाची उभारणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित हर घर झेंडा या उपक्रमाच्या आयोजनासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सहायक आयुक्त सोलापूर महानगरपालिका श्रीमती पुष्पगंधा भगत, सहायक पोलीस आयुक्त दिपक आर्वे, पोलिस निरिक्षक सोलापूर शहर शिवशंकर बोंदर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अनिल विपत, विस्तार अधिकारी शिक्षण विभाग जि.प. सुहास गुरव तसेच अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, सर्व शासकीय तसेच निमशासकीय विभाग प्रमुख व खाजगी आस्थापनांनी आपापल्या स्तरावर हर घर झेंडा हा उपक्रम दिनांक 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नागरिकांना याबाबत प्रोत्साहित करावे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 75 फूट उंच राष्ट्रध्वज उभारणी करण्यात येणार आहे. तरी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ते नियोजन करावे असेही त्यांनी सूचित केले.
शासन निर्देशानुसार या उपक्रमासाठी जिल्ह्यात साधारणत: साडेसात लाख तिरंगा ध्वज आवश्यक असून ते जिल्हास्तरावर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ध्वज संहितेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तिरंगा ध्वज नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत नागरिकांनी आपल्या घरावर स्वप्रेरणेने हे ध्वज लावावेत असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सूचित केले.
या उपक्रमाअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेने ग्रीन बेल्ट स्वातंत्र्य बागेची निर्मिती करण्यासाठी त्यांच्या स्तरावरून योग्य ते नियोजन करावे. तसेच महापालिकेच्या हद्दीतील सर्व घरांची माहिती घेऊन प्रत्येक नागरिकापर्यंत हा उपक्रम पोहोचण्यासाठी दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगून या अंतर्गत वृक्ष लागवड मोहीम मोठ्या प्रमाणात केली जाणार असून याकरिता वनविभागाने नियोजन करून याबाबत चा अहवाल सादर करावा असेही त्यांनी निर्देशित केले.
हर घर झेंडा या उपक्रमात प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृतीपर मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये सर्व प्रसार माध्यमांचा वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत हा उपक्रम पोहोचवला जाईल. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून चोखपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिले.
प्रारंभी आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेच जिल्हास्तरीय समन्वयक उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख यांनी हर घर झेंडा या उपक्रमाबाबत माहिती बैठकीत सादर केली. तसेच प्रत्येक विभागाने करावयाच्या कामांची माहिती देऊन परस्परात समन्वय ठेवण्याचे आवाहन केले.
No comments:
Post a Comment