माझी उमेदवारी फिक्स झाली अशा गैरसमजात कोणी राहु नका - अजिंक्यराणा पाटील

मोहोळ नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा - आमदार यशवंत माने
राष्ट्रवादीची नगरपरिषद निवडणूकी बाबत मोहोळमध्ये बैठक
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- येत्या काळात होणाऱ्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची कोणतीही यादी अद्याप फायनल केलेली नाही. कोणीही कितीही पक्षश्रेष्ठींना वेळोवेळी भेटून मलाच उमेदवारी फायनल झाल्याचा आव शहरात आणत असले तरी अद्याप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही यादी फायनल केलेली नसून प्रत्येक प्रभागातील प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या जनाधाराची माहिती गोपनीयरित्या घेऊन योग्य ते सर्वेक्षण करूनच उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल अशी स्पष्टोक्ती युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी मोहोळ येथे दिली.
मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोहोळ नगरपरिषद निवडणूकी बाबत विचारविनिमय बैठक १४ जुलै रोजी मोहोळ नागरी पतसंस्थेच्या सभागृहात इच्छुक उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
यावेळी बोलताना आमदार यशवंत माने म्हणाले की शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी लवकरच तांत्रिक मंजुरी घेतली जाईल.मोहोळ शहरासाठी आजवर कधीही निधी कमी पडू दिला नाही. संपूर्ण शहराच्या १७ प्रभागांना निधी दिला. माझ्या मतदारसंघातील तालुक्याचे शहर या आपुलकीच्या भावनेने निधी दिला. मी राष्ट्रवादीचा आमदार आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे मोहोळ नगरपरिषद अनगर नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे बी फार्म माझ्याकडेच असणार आहेत. याबाबतची कल्पना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमक्ष राजन पाटील यांनी यापूर्वीच दिले आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी निश्चींत राहून एकदिलाने निवडणुकीसाठी सज्ज राहावे. - आमदार यशवंत माने.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शहाजहान शेख होते. यावेळी व्यासपीठावर आमदार यशवंत माने, नागनाथ सोनावणे, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, शहराध्यक्ष कुंदन धोत्रे, उपाध्यक्ष हेमंत गरड, वैभव गुंड इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष प्रमोद डोके म्हणाले की शहरातील काही उपनेते राष्ट्रवादीचे बी फार्म आमच्याकडेच असून उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही हे आमच्या हातात आहे असे भासवत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत आमदार माने यांनी पक्षाची बी फॉर्म कोणाकडे असणार आहेत हे जाहीर करावे राष्ट्रवादीच्या सत्तेत सहभागी झालेल्या काही नगरसेवकांनी पक्षाकडून निधी घेऊन निकृष्ट दर्जाची कामे करून त्यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.
यावेळी मंगेश पांढरे यांनी पक्षातील काही लोक सकाळी विरोधी पक्षाकडे दुपारी दुसऱ्या पक्षात तर रात्री तिसऱ्याच पक्षात असतात तेच शहराच्या राष्ट्रवादीचे कारभारी बनल्याचा आक्षेप नोंदवला.वारंवार त्याच त्या धनिक उमेदवारांना उमेदवारी न देता कधी तर सतरंज्या उचलणाऱ्या आणि प्रामाणिक पक्षकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी देऊन पक्षाने न्याय द्यावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली.
तर भैय्या कोरे यांनी प्रभाग सहा मधील उमेदवारी यापूर्वी लोकप्रतिनिधित्व केलेल्या आणि उमेदवारी दिलेल्याना न देता नवीन उमेदवाराला संधी देण्याची मागणी केली. त्याच त्या लोकांना संधी देऊन त्यांनी स्वतःच ठेकेदारी करून पैशाच्या जोरावर इतर पक्षात जाऊन निवडून येतात केवळ स्वार्थाचे राजकारण केल्याचा गंभीर आरोप यावेळी कोरे यांनी भर बैठकीत केला. आणि राष्ट्रवादीशी निष्ठावंत असणाऱ्या नवख्या उमेदवाराला संधी द्यावी अशी ही मागणी यावेळी कोर यांनी केली.
यावेळी संतोष खंदारे ,माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके,शैलेश सरवदे यांनीही आपापले मनोगत व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक हेमंत गरड यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment