प्रभाग क्रमांक सहा मध्ये नवनाथ पवारांना मिळतोय वाढता जनाधार


सांगोला शहराचा कायापालट करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच : नवनाथ पवार
सांगोला (कटुसत्य वृत्त):- सांगोला नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक आयोगाला सहा महिने निवडणुका पुढे घेण्याची मागणी करीत आहेत. निवडणुका पुढे जाणार की निवडणूक आयोगाच्या नियोजनाप्रमाणे होणार,हे येणारे काही दिवस वाट पहावी लागणार आहे.पण सांगोला शहरात मात्र नगरपालिका निवडणुकीचा धुराळा उडणार आहे,हे मात्र नक्की. सांगोला शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार मात्र सक्रीय झाले असून , त्यांना नागरिकांतून जनाधार वाढला असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. स्वतः नवनाथ पवार मात्र विकास कामाचा जनता दरबार भरवित असल्याने त्या प्रभागातील विरोधक मात्र "तेरी भी चूप मेरी भी चूप "च्या भूमिकेत असलेले दिसून येत आहेत.
सांगोला नगरपालिकेच्या दहा प्रभागातून वीस आणि एका प्रभागातून तीन असे अकरा प्रभागातून 23 नगरसेवक नगरपालिकेत निवडून जाणार आहेत. प्रभाग क्र सहा हा प्रभाग सर्वसाधारण पुरुष आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. नवनाथ पवार यांनी या प्रभागाचे जवळपास पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केले असल्याने त्यांचा या प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे. लोकांच्या संपर्कातील नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.गेल्या नगरपालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणुक लढवली होती.त्या निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी पुरस्कृत नगरसेवक गजानन बनकर यांच्याकडून निसटता पराभव झाला होता.
विद्यमान नगरसेवक हे प्रभागातील विकास कामे करण्यात अपयशी ठरलेले आहेत.मी पंधरा वर्षे या प्रभागातील लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे.या प्रभागातील जवळपास ७० टकके कामे मी मार्गी लावलेली आहेत. लोकांच्या सुख दुःखात मी नेहमीच सहभागी होत असतो.या प्रभागातील रस्त्याची,विजेची, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे. निवडणुका कधी ही जाहीर झाल्या तरी मी निवडणुकीला तयारीत असल्याचेही नवनाथ पवार यांनी दै. कटूसत्यच्या प्रतिनिधीशी सांगितले.
"सांगोला शहराच्या विकासासाठी कोणत्या नगरसेवकांनी कंबर कसली,आणि नागरिकांच्या नजरेत कुणाची कामगिरी सरस ठरली , विशेष अपयशी ठरले,आणि जनतेच्या मनातील भावी नगरसेवक कोण"या वर आधारित सांगोला नगरपालिका निवडणुक " जनतेचा कौल" या विशेष लेख मालिकेतून प्रसिध्द होणार आहे.
No comments:
Post a Comment