अतिवृष्टी- आतापर्यंत ११० नागरिकांचा मृत्यू - १४ हजार ४८० नागरिकांचे स्थलांतर

मुंबई, (नासिकेत पानसरे):- सध्या राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली असली तरीही राज्यात १ जूनपासून आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका २८ जिल्ह्यांना बसला असून आजतागायत १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरीकांना आपला जीव गमाववा लागला आहे. शिवाय या नैसर्गिक संकटात २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलै पर्यंत सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत अवजड वाहनाच्या एकेरी वाहतुकीसाठी सुरु राहणार आहे. तर संध्याकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात सध्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. तसेच वर्धा, प्राणहिता आणि इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून, नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच चंद्रपूर, वरोरा आणि भद्रावती येथील नागरीकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. तसेच आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात जिल्ह्याची सद्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे.
राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १६ तुकड्या तैनात
मुंबई - (कांजूरमार्ग १,घाटकोपर १) - २, पालघर - १, रायगड - महाड - २,ठाणे -२, रत्नागिरी - चिपळूण - २, कोल्हापूर - २, सातारा - १,चंद्रपूर - १,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड - १, गडचिरोली - १,चंद्रपूर - १ अशा एकूण तीन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात आहेत.
No comments:
Post a Comment