ठिबक सिंचन पद्धतीमुळे उत्पादन दुप्पट वाढ होते - गोविंद भोसले

बेंबळे (कटूसत्य वृत्त):- कोणत्याही पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळते, विद्राव्य खतांचापुरवठा करता येतो व उत्पादनात दुपटीने वाढ होते असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक , माजी सरपंच व प्रतिष्ठित बागायतदार गोविंद भोसले यांनी केले आहे. कृषी विभाग टेंभुर्णी, जैन इरिगेशन व सप्तेश्वर ऍग्रो फार्म बेंबळे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ठिबक सिंचनाचे महत्त्व या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये गोविंद भोसले मार्गदर्शन करत होते, अध्यक्षस्थानी सरपंच विजय पवार होते.
पुढे बोलताना गोविंद भोसले म्हणाले की ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते व कमी वेळात जास्त क्षेत्र भिजवता येते, जमिनीची सुपीकता व मातीतील सामू (पी.एच.) कायम राखण्यास मदत होते .परिसंवादात बोलताना व्यवस्थापक संतोष डांगे यांनी ठिबक संचाची निवड व देखभाल याविषयी सखोल माहिती सांगितली. याप्रसंगी किरण डोके यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली व शंकांचे निरसन केले.या कार्यक्रमास कृषी विभागीय इंजिनियर गजानन कोटकर, ऊस भूषण शेतकरी सोमनाथ हुलगे, प्राध्यापक मोहन भोसले, महेश रामदासी, सिद्धेश्वर शिंदे, गंगाधर भोसले, प्रभाकर भोसले आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजन ,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जयवंत भोसले यांनी केले .याप्रसंगी कृषी विभागातर्फे ठिबक सिंचनाची निवड, मांडणी ,साईज व कोणत्या पिकास किती पाणी द्यावे याविषयी एक फिल्म दाखवण्यात आली.
No comments:
Post a Comment