एकाच रात्रीत मोहोळ तालुक्यात एसबीआयचे बँक ऑफ इंडियाचे आयडीबीआय अशा तीन एटीएम फोडून पन्नास लाखांच्या रक्कमेवर डल्ला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 8, 2022

एकाच रात्रीत मोहोळ तालुक्यात एसबीआयचे बँक ऑफ इंडियाचे आयडीबीआय अशा तीन एटीएम फोडून पन्नास लाखांच्या रक्कमेवर डल्ला

एकाच रात्रीत मोहोळ तालुक्यात एसबीआयचे बँक ऑफ इंडियाचे आयडीबीआय अशा तीन एटीएम फोडून पन्नास लाखांच्या रक्कमेवर डल्ला

            मोहोळ (कटूसत्य वृत्त) : मोहोळ तालुक्यामध्ये कुरुल आणि मोहोळ येथे एकूण दोन ठिकाणी एटीएम मशीन फोडून एकूण ४९ लाख २७ हजार ५00 रुपयांची चोरी झाल्याची आणि १ लाख ५० हजाराचे मशीनचे नुकसान झाल्याची घटना घडली. यापैकी कुरुलमध्ये बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून २२ लाख ९९ हजार तर मोहोळमध्ये स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी २६ लाख २८ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. पंढरपूर रस्त्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. कुरुल येथे पहाटेच्या वेळी चार अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळील एटीएम मशीन फोडल्याची तक्रार एटीएम मशीनचे रिजनल मॅनेजर अमोल अरुण पवार यांनी कामती पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. 

            या तीन्ही घटनेमुळे मोहोळ तालुक्याच्या बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून चोरट्यांनी मोहोळ पोलिसांना एकाच रात्रीत दोन एटीएम फोडून उघडपणे आव्हान दिले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथून अंगुलीमुद्रा आणि ठसे तज्ज्ञांचे पथक मोहोळ आणि कुरूल येथे पाचारण करण्यात आले.

            याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ शहरातून जाणाऱ्या विजापूर रोड लगत हॉटेल लोकसेवा नजीक स्टेट बँकेचे दोन एटीएम आहेत. एक एटीएम बँक लगत असून दुसरे एटीएम क्षीरसागर यांच्या सरकार मान्य देशी दारू दुकाना लगत आहे.

            बँकेपासून दोनशे फुटांवर असलेल्या एटीएम मशीन गॅस कटरने कापून अज्ञात चोरट्यांनी एटीएम मधील पाचशे रुपये दराच्या चार हजार 872 चलनी नोटा असे एकूण 24 लाख 36 हजार रुपये तर एक लाख 92 हजार 500 रुपये किमतीच्या शंभर रुपये दराच्या 1925 नोटा असे एकूण 26 लाख 28 हजार 500 रुपयांची रक्कम लुटली. विशेष म्हणजे सदर एटीएमला असलेल्या सीसीटीव्ही वर हिरव्या रंगाचा स्प्रे मारून ते दृष्टिहीन करण्यात आले. मगच चोरट्यांनी या रकमेवर डल्ला मारला. सदर एसबीआय बँकेच्या एटीएमचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याच रात्री पहाटे 02:56 वाजता मोहोळ शहरातील पंढरपूर रोड लगत असलेल्या आयडीबीआय बँकेच्या शाखेच्या एटीएमची देखील तोडफोड करण्याचा प्रयत्न सदरच्या चोरट्यांनी केला. मात्र सदरचे एटीएम भर रस्त्यावर असल्यामुळे चोरट्यांनी तो प्रयत्न यशस्वी होत नसल्याचे पाहून सदर ठिकाणाहून पळ काढला. मोहोळ लुटीच्या घटनेबाबत स्टेट बँकेच्या सोलापूर येथील चॅनेल मॅनेजर स्मिता लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएम कॅश पुरवठ्याचे आणि देखभालीचे दायित्व असलेल्या हिताची पेमेंट सर्विस या कंपनीच्या चॅनेल एक्झिक्युटिव्ह किरण संजय लांडगे यांनी फिर्याद दिली आहे. कुरुल येथील लुटीच्या घटनेबाबत इलेक्ट्रॉनिक पेमेंट अॅन्ड सर्व्हसेस प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचे रिजनल मॅनेजर अमोल अरुण पवार रा. बाळे यांनी फिर्याद दिली असून मोहोळ येथील तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर तर कुरुल येथील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने करत आहेत.

            मोहोळ शहर व तालुक्यात एका रात्रीत तीन एटीएम मशीन फोडून मोठ्या रकमेची कॅश लुटल्यामुळे सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार विविध तपास पथके मोहोळ शहराच्या दिशेने पाठवली. मोहोळ आणि कुरुल येथे घटना स्थळाला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी भेट देऊन त्यांनी पोलीस निरीक्षक अशोक सायकर, कामतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्यासमवेत जाऊन एटीएम लुटीच्या ठिकाणाला भेट देऊन माहिती घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages