वादग्रस्त औरंगाबाद शहराचे नाव "संभाजीनगर" करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता !

मुंबई (नासिकेत पानसरे):-राज्यात राजकीय घडामोडीना वेग आला असताना बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने शहरांच्या नामांतराचा सपाटा लावल्याचे चित्र होते. बहुप्रतीक्षित आणि वादग्रस्त अशा औरंगाबाद शहराचे नाव "संभाजीनगर" करण्यास आणि उस्मानाबाद शहराचे "धाराशीव" असे नामकरण करणाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तर दुसरीकडे पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा, अशी मागणी करीत काँग्रेसच्या दोन मंत्री मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पाडल्यामुळे चर्चाना उधाण आले होते.
या बैठकीत नवीमुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील असे नामकरण करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शिवसेने एक पाऊल मागे घेतले असल्याचेही बोलले जाते. दरम्यान, या बैठकीत महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षाचे मंत्री हजर झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या बैठकीस प्रत्यक्ष उपस्थिती होती. पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्याची माहिती देखील बाहेर आली आहे.
माझ्याच लोकांनी मला दगा दिला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आजची बैठक महत्वाची असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, काहीसे थकलेले मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत अधिकचे बोलणे टाळले. मंत्रालयात आल्यापासून ते काहीसे शांत शांत होते. कॅबिनेट मध्ये त्यांनी शांत राहणे पसंत केले. शेवटी त्यांनी महविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून सहकार्य केल्याबद्दल कॅबिनेट मधील सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. आणि माझ्याच लोकांनी मला दगा दिला अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे उद्यापर्यंत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments