टेंभुर्णी-बेंबळे रस्त्याच्या कामात मुद्दाम दिरंगाई... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, June 12, 2022

टेंभुर्णी-बेंबळे रस्त्याच्या कामात मुद्दाम दिरंगाई...

 टेंभुर्णी-बेंबळे रस्त्याच्या कामात मुद्दाम दिरंगाई...


आषाढी एकादशीच्या आत काम पूर्ण व्हावे...

भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांची चौकशी व्हावी - जिल्हाअधिकारीयांना निवेदन

                 बेंबळे (कटुसत्य वृत्त): बेंबळे टेंभुर्णी रस्त्याच्या कामात ठेकेदार व अधिकाऱ्याकडून जाणून बुजून मुद्दाम दिरंगाई होत असून आषाढी एकादशीच्या आत हे काम पूर्ण व्हावे अन्यथा संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांचे निलंबन  करण्यात यावे व तसेच निकृष्ट प्रतीचे काम करणार्या व कामाच्या बाबतीत दिरंगाई करणाऱ्या स्वार्थी ठेकेदाराला 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकून पुन्हा याला कोणतेही काम मिळू देऊ नये अशी व्यवस्था करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांना बेंबळे येथील नागरिकांच्या वतीने देण्यात येत आहे.

                 वृत्तांत असा की टेंभुर्णी बेंबळे या साडेसहा किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम मार्च 21 मध्ये मंजूर झाले होते व मार्च 22 पूर्वी काम पूर्ण करण्याचे निश्चित होते. परंतु मे 22 पर्यंत काहीच काम केले नाही पण नंतर पावसाळा म्हणून व त्या नंतर ऊस वाहतुकीच्या वाहनांची अडचण सांगून एप्रिल 22 पर्यंत कोणतेही काम केले नाही. मागील दोन महिन्यापुर्वी रस्त्याचे काम सुरू केले पण खडीचा थर कमी वापरला, बाजूच्या साईड पट्ट्या भरून घेतल्या नाहीत तसेच डांबरामधे  कुठलं तरी काळे तेल डांबरात भेसळ करून हे काम अतिशय निकृष्ट केले आहे, शिवाय हे काम एक महिन्यापासून बंदच आहे. अनेक वेळा संबंधित अधिकारी व ठेकेदाराकडे नागरिकांनी चौकशी केली परंतु टोलवाटोलवीची उत्तरे शिवाय काही हाती लागले नाही.

                 दहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, जळगाव धुळे नगर बुलढाणा वाशिम नाशिक या भागातून गावोगावच्या लहान पालख्या , दिंड्या व त्याबरोबर येणारे शेकडो- हजारो वारकरी, टेंभुर्णी पासून पुढे जवळचा मार्ग म्हणून बेंबळे- घोटी- जळोली -करकंब मार्गे पंढरपूरला जातात, त्यांच्यासाठी रस्ता चांगला असणे आवश्यक आहे परंतु गेंड्याच्या कातडीचे भ्रष्ट अधिकारी , लबाड व निकृष्ट काम करणारे स्वार्थी ठेकेदार यांच्या संगनमताने येथील कामास विलंब लावलेला आहे व जनतेला वेठीस धरले आहे. बेंबळे हा बागायती परिसर असून लाखो टन ऊस फळे भाज्या दूध याची वाहतूक या रस्त्यावरून सतत होत असते, दररोज मोटरसायकल, जीप्स ट्रॅक्टर व इतर अवजड वाहनांची वाहतूक सतत चालू असते या सर्व बाबींची  अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला कल्पना आहेच. या रस्त्यावरून घोटी कांन्हापुरी वाफेगाव सांगवी जळवली बेंबळे हरिनगर काळेवस्ती भोसलेवाडी मिटकलवाडी माळेगाव आदी ठिकाणांहून हजारो नागरिकांची सतत ये जा चालू असते, केवळ खराब रस्त्यामुळे या रस्त्यावरुन होणाऱ्या एसटीच्या खेपा आता बंद पडल्या आहेत व त्यामुळे अवैध वाहतुकीला जोर वाढला आहे. रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये निधी शासन मंजूर करते परंतु भ्रष्ट अधिकारी व स्वार्थी ठेकेदार संगनमताने कामच करत नाहीत आणि केलेच तर निकृष्ट प्रतीचे करतात किंवा दिरंगाई करतात व बिल काढून घेण्यात मात्र तत्परता दाखवतात हे उघड सत्य आहे. कनिष्ठ कार्यालयातील लिपिका पासून ते गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यापर्यंत टक्केवारी ठरलेली असते असे बोलले जाते, जनतेला मात्र निष्कारण वेठीस धरले जात आहे व या हरामखोरांचे धंदे पाहत बसण्याशिवाय इलाज राहिलेला नाही. या सर्व सत्य परिस्थिती विरोधात लवकरच जिल्हाधिकारी यांची नागरिक भेट घेणार आहेत व त्यांना वस्तुस्थिती चे निवेदन सादर करण्यात येणार आहे.

बेंबळे -घोटी रस्ता...

                 बेंबळे घोटी या चार किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. 'रस्त्यात खड्डे की खड्ड्याचाच रस्ता' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे खड्डे बुजवण्याचे काम आषाढी एकादशीच्या अगोदर युद्धपातळीवर व्हावे अशी ही नागरिकांची रास्त मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages