जे नेतृत्व अतिटोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टींना जबाबदार आहे - शरद पवार

मुंबई (नासिकेत पानसरे):- एसटी कर्मचारी कारण नसताना काही महिने घरदार सोडून नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे आर्थिक संकट त्यांच्या कुटुंबावर आले त्यासाठी आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका त्यांना घ्यावी लागली. त्यामुळे जे नेतृत्व अतिटोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टींना जबाबदार आहे असा थेट आरोप करतानाच त्याच्यातून जे काही नैराश्य आले ते नैराश्य कुठेतरी काढलं पाहिजे म्हणून याठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला बाकी त्याच्यामध्ये दुसरं काही नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आज एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओक येथे आंदोलन केले. त्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.
आज इथे जे काही घडलं त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करायचं कारण नाही.ज्याप्रमाणे महाराष्ट्रात राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता. तो शोभनीय नव्हता असेही शरद पवार म्हणाले.
एसटी कर्मचारी आणि आपले गेले ५० वर्ष घनिष्ट संबंध आहेत. त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून चुकले नाही. ज्या ज्यावेळी प्रश्न निर्माण झाले त्यावेळी त्यांच्या प्रश्नांना हातभार लावून सोडवण्यासाठी सहकारी लोकांनी कष्ट घेतले. मात्र याचवेळी एक चुकीचा रस्ता दाखवला गेला आणि त्याचे दुष्परिणाम आज याठिकाणी आहेत असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.
आपण संयम पाळणारे लोकं आहोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आपण पाठिशी आहोत परंतु चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही हेही शरद पवार यांनी आवर्जून स्पष्ट सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता कोण दाखवत असेल तर त्या रस्त्याने विरोध करणे ही तुमची माझी जबाबदारी आहे असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान ही घटना कळल्यानंतर तात्काळ कार्यकर्ते इथे पोचले. संकट आलं की आपण एक आहोत हेच तुम्ही दाखवून दिले त्याबद्दल शरद पवार यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
0 Comments