बोगस बियाणांमुळे 4 एकरावर बहरलेल्या सोयाबीनवर फिरवला रोटर

पण कधी अवकाळी पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन यामधून सोयबीन सावरले एवढेच नाही तर बहरले देखील मात्र, या बहरलेल्या सोयाबीनला ना फुले ना शेंगा अशी अवस्था बार्शी तालुक्यातील धामणगावच्या शेतकऱ्याची झालेली आहे. बोगस बियाणामुळे सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे कालीदास बोधले यांनी 4 एकरातील या पिकावर चक्क रोटाव्हेटर फिरवला आहे. एकीकडे चार महिन्याची मेहनत तर वाया गेलीच पण दुसरीकडे बीज कंपनीने जबाबदारी न स्विकारता हात झटकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण असा सवाल पुन्हा उपस्थित झाला आहे.
खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. मुख्य पिकालाच फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरच परिणाम झाला होता. पण उपलब्ध पाणीसाठा आणि पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात पीक पध्दतीमध्ये बदल करुन सोयाबीनवर भर दिला होता. शिवाय सर्वकाही नियोजनानुसार सुरु असतानाच बार्शी तालुक्यातील धामणगावच्या शिवारातील सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कालीदास बोधले यांचा उद्देश तर साध्य झालाच नाही पण अधिकचा खर्च करावा लागला आहे. सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याने उत्पादन पदरी पडण्याच्या आशाच मावळल्या आहेत.
तसं पाहयला गेलं तर रोटाव्हेटरचा वापर हा शेती मशागत करण्यासाठी केला जातो. पण कालीदास बोधले यांना पीक काढणीसाठी करावा लागला आहे. चार महिने तळ हाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी पिकांचा जोपासणा करतो आणि ऐन वेळी अशी परस्थिती ओढावते. त्यामुळे शेती करायची तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे. 4 एकरामध्ये किमान 30 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळेल असा आशावाद होता पण रोटाव्हेटरला पैसे देऊन ही पीक वावराच्या बाहेर काढण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढावली आहे.
सोयाबीन अंतिम टप्प्यात असतानाही शेंगाच लागत नसल्याने शेतकरी कालीदास यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार केली पण बीज कंपनीने हात झटकले आहेत. शिवाय शेतकऱ्यालाच सल्ला दिला आहे. अशा प्रसंगी कृषी विभागाने हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना मदत कऱणे अपेक्षित आहे. यासंबंधी कालीदास बोधले यांनी तक्रारही नमूद केली असून कृषी विभाग काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment