दहावी-बारावी परीक्षेसाठी शाळेचे शिक्षकच पर्यवेक्षक! 'कॉपी'चे स्कॉड नसणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 17, 2022

दहावी-बारावी परीक्षेसाठी शाळेचे शिक्षकच पर्यवेक्षक! 'कॉपी'चे स्कॉड नसणार

 दहावी-बारावी परीक्षेसाठी शाळेचे शिक्षकच पर्यवेक्षक! 'कॉपी'चे स्कॉड नसणार


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दहावी-बारावीच्या परीक्षा पध्दतीत यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीचे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न बोर्डाने केला आहे. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून त्याच शाळेतील शिक्षकांची नियुक्‍ती केली जाणार आहे. तर कॉपी प्रकरणांचा शोध घेण्यासाठी यंदा "स्कॉड' नसतील. शेजारील शाळेतील एका शिक्षकाची बैठे पथक म्हणून नियुक्‍ती केली जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर ऑफलाइन पध्दतीने शिक्षण घेता आले नाही. ऑनलाइन पध्दतीने शिकवलेले त्यांच्या डोक्‍यावरून गेले. तरीही, शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही दहावी-बारावीचे वर्ग ऑफलाइन ठेवण्यात आले. परंतु, त्या वेळेत संपूर्ण अभ्यासक्रम ऑफलाइन पध्दतीने शिकवता आला नाही. प्रात्यक्षिक परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यासक्रम शिकवणे सुरुच होते. या सर्व बाबींचा अभ्यास करून यंदाही एकूण अभ्यासक्रमाच्या 75 टक्‍के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 15 ते 30 मिनिटांचा वेळही वाढवून दिला आहे. तसेच परीक्षेवेळी विषय शिक्षक वगळून शाळेतील सर्वच शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून परीक्षेसाठी नेमले जाणार आहे. कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने विद्यार्थ्यांची अंगझडतीही होणार नाही. शाळा तेथे परीक्षा केंद्र असल्याने फिरते पथक नियुक्‍तीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुसऱ्या शाळेतील एका शिक्षकाला त्या केंद्रावर स्कॉड म्हणून नियुक्‍त केले जाणार असून गरज भासल्यास प्राथमिक शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे. तरीही, विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाखाली राहू नये, प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, जेणेकरून पुढील शैक्षणिक वाटचाल खडतर राहणार नाही, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. फिरते पथक यंदा नाहीच दहावी-बारावीच्या परीक्षेत काहीजण प्रश्‍नपत्रिका सोडविताना पुस्तकात अथवा नोट्‌समध्ये पाहून उत्तरे लिहितात. परीक्षा पारदर्शक व्हावी, कोणीही कॉपी करू नये म्हणून बोर्डाकडून स्कॉड तथा फिरत्या पथकांची नियुक्‍ती केली जाते. मात्र, कोरोनामुळे यंदा तसे काही होणार नसून शेजारील शाळेतील शिक्षकच परीक्षा होईपर्यंत त्याठिकाणी बैठे स्कॉड म्हणून नेमले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी कॉपी करून लिहून स्वत:ची फसवणूक करू नये, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages