महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या फी वाढीवरून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक
सांगोला (कटूसत्य वृत्त):- कोरोना महामारीच्या काळात महाविद्यालय बंद असतानाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून जादा फी आकारली जाते. ही बाब समोर आणून तात्काळ वाढीव फी कमी न केल्यास लोकशाही मार्गाने महाविद्यालया समोरच आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सुरवसे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
गेली दोन वर्षांच्या काळात महाविद्यालय तसेच सर्व प्रयोगशाळा ग्रंथालय व अन्य उपक्रम बंद असूनही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारी लॅबरोटरी फी, जिमखाना फी, लायब्ररी फी, प्रो रेटा फी, गॅदरिंग फी, कॉलेज मॅक्झीन फी, युवक महोत्सव फी, फ्युअल चार्ज फी, ॲल्लूमिनी फी, कॅम्प ट्रेनिंग फी, युनि. क्रिडा फी, एक्स्ट्रा करीक्युलर फी या नावाखाली महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल केली जात आहे. ही बाब लक्षात येताच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष अमोल सुरवसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुयश बिनवडे, ऋषी शिंदे यांसह पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी सांगोला येथील विज्ञान महाविद्यालय सांगोला व सांगोला महाविद्यालय सांगोला या दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्यांना अतिरिक्त फी कमी करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले.
आधीच कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले असताना सर्व महाविद्यालयीन उपक्रम बंद असूनही बहुतांशी शेतकऱ्यांची मुले असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करणे हे सुसंगत ठरणार नाही. म्हणून महाविद्यालय प्रशासनाने वाढीव फी तात्काळ कमी करावी, अन्यथा नाइलाजास्तव महाविद्यालया समोरच लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशाराही या निवेदनातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment