दररोज वृत्तपत्रे ,नियतकालिके व पुस्तकांचे वाचन केल्यास ज्ञानात व माहितीत भर पडते - नागनाथ भुसारे
माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकजण पैसा कमविण्यासाठी धडपडत आहेत तसेच युवा पिढीकडून मोबाईलसह इतर आधुनिक मनोरंजनाच्या साधनांचा अतिरेकी वापर करीत आहेत त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे यावर उपाय ठोस म्हणून प्रत्येकाने दररोज विविध वृत्तपत्रे,नियतकालिके व दर्जेदार पुस्तकांचे वाचन केले पाहिजे असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ भुसारे यांनी केले आहे.
ते दारफळ सीना ता.माढा आधारछत्र समाजसेवी संस्थेच्या वतीने वृत्तपत्रे वाचनालयाचा शुभारंभ करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी उपसरपंच शिवाजी बारबोले होते.
पुढे नागनाथ भुसारे यांनी सांगितले की,सध्या सोशल मीडियाचा प्रभाव जास्त वाढत आहे त्यामुळे वृत्तपत्रे, नियतकालिके व पुस्तके वाचणा-यांची संख्या कमी होत चालली आहे. गावातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना सहजासहजी वाचन करण्यासाठी विविध वृत्तपत्रे उपलब्ध व्हावीत म्हणून आधारछत्र संस्थेतील शासकीय अधिकारी व नोकरदार यांनी सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रप्रमुख नागनाथ उबाळे यांनी सांगितले की,दररोज विविध वृत्तपत्रांचे वाचन केल्यास आपल्या ज्ञानात व माहितीत भर पडते शिवाय आपल्या आजूबाजूला आणि देशपातळीवर घडलेल्या घटना व घडामोडी यांची माहिती मिळते.शालेय विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वृत्तपत्रे उपयुक्त ठरतात. वृत्तपत्रांमधून विविध क्षेत्रातील प्रेरणादायी लोकांची माहिती तसेच सुखदुःखाच्या घटना कळतात त्यामुळे या वृत्तपत्रे वाचनालयाचा वाचकांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी प्रदीप कांबळे,पोलीस पाटील हौसाजी पाटील,धान्य बँकेचे अध्यक्ष शहानवाज सय्यद,अरविंद बागल, भुजंग शिंदे,विजय शिंदे,लहू चव्हाण, किशोर शिंदे,बाळासाहेब बारबोले यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
0 Comments