सांगोल्यातील दक्षता व साळे हॉस्पिटलमध्ये म.जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करा - भरत(अण्णा) शेळके

सेक्युलर मूव्हमेंटच्या वतीने निवेदन सादर

सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र सरकारची म.जोतिबा फुले जनआरोग्य योजना ही सर्वसामान्य कुटुंबाला मोठा आधार देणारी योजना आहे. संपूर्ण राज्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला जवळपास 972 आजारावर मोफत उपचाराची तरतुद असून अनेकांचे जीव वाचले आहेत. संपूर्ण राज्यात या योजनेचा लाभ मिळत असला तरी सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनता मात्र या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे सांगोला शहरातील दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, साळे हॉस्पिटल तसेच अन्य सुविधायुक्त हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करावी अशी मागणी सेक्युलर मूव्हमेंटचे कार्याध्यक्ष भरत(अण्णा) शेळके यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन काल दि. 29 रोजी नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील सर्वसामान्य कुटुंबाला मोफत आरोग्यसेवा मिळावी व पैशाअभावी कुणाचाही जीव जाऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने 2 जुलै 2012 पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना लागू करण्यात आली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यातील सहा जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. पुढे जाऊन ही योजना संपूर्ण राज्यात लागून करण्यात आली. शिवाय या योजनेचे महात्मा फुले जनआरोग्य योजना असे नामकरण करण्यात आले. यामध्ये केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा, राजीव गांधी कार्ड असणाऱ्या लोकांना 972 आजारावरती दीड लाखापर्यंत मोफत तर किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपयांपर्यंतची तरतूद करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ राज्यातील लाखो लोकांना झाला असून अनेकांचे जीव वाचले आहेत.
परंतु सांगोला तालुक्यातील जनता मात्र या योजनेपासून वंचित राहिल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना सारख्या महामारीत पैशाअभावी व उपचाराअभावी अनेकांचे जीव गेले आहेत. यामध्ये सर्वसामान्य लोकांना जास्त झळ पोहचली असल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सेक्युलर मूव्हमेंटच्या वतीने सांगोला नायब तहसीलदार यांना निवेदन देवुन शहरातील दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, साळे हॉस्पिटल तसेच अन्य सुविधायुक्त हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला पैशाअभावी व उपचाराअभावी अनेकांना जीव गमवावा लागला. प्रशासनाने आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून सर्व सुविधायुक्त हॉस्पिटलमध्ये म. जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करावी अन्यथा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आमच्या संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल - भरत(अण्णा) शेळके
0 Comments