पंचायत समिती सदस्यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन खरेदी करावे : आ. मोहिते पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- राज्यात व देशात ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक कोरोना रुग्ण दगावण्याच्या केसेस वाढल्या आहेत. ग्रामीण भागात तर ऑक्सिजन बेडही उपलब्ध होत नाही . यावर उपाय म्हणजे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी राज्यातील पंचायत समिती सदस्यांनी त्यांना मिळणा-या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन खरेदी करावे असे आवाहन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.
आ. मोहिते पाटील म्हणाले, माळशिरस तालुक्यासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत . सोलापूर जिल्ह्यात ७ लाख २७ हजार ५६० कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ९५ हजार ९९२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना होम क्वारंटाईन केले आहे . १० हजार ४५१ रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ५ हजार ९६४ रुग्ण गावागावांत उभा केलेल्या कोवीड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. माळशिरस तालुक्यात आज अखेर सुमारे १ लाख १३ हजार चाचण्या झाल्या आहेत. आज जवळपास २०७७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत . त्यापैकी सुमारे ४५० रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये माळशिरस तालुक्या बाहेरील रुग्णांची संख्या ही २०० पेक्षा अधिक आहे. माळशिरस तालुक्याच्या ग्रामीण भागात कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत.
आ. मोहिते पाटील म्हणाले , राज्यातील या कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज आहे व शासन ती पुर्ण करु शकत नाही . त्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून पंचायत समिती सदस्यांना जो निधी प्राप्त होतो . तो निधी आरोग्य विभागाला दिला तर या निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन खरेदी करता येइल . त्याचा उपयोग ग्रामीण भागातील रुग्णांना होइल व असंख्य रुग्णांचे प्राण वाचतील . राज्यात सुमारे ३५१ पंचायत समित्या आहेत . या पंचायत समित्यांच्या सदस्यांची एकूण संख्या ही ५ हजारापेक्षा अधिक आहे . एकट्या माळशिरस तालुक्यात २२ पंचायत समिती सदस्य आहेत . त्यांनी १५ व्या वित्त आयोगातुन मिळणाऱ्या निधीपैकी २५ टक्के निधी आरोग्य विभागाला खर्च केला तर हा निधी सुमारे २२ लाख मिळेल . एका ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची किंमत ही ६० ते ७० हजार रुपये आहे . एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन दैनंदिन पाच कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करु शकते . सुमारे २२ लाख रुपये निधीतून सुमारे ३५ ते ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन खरेदी करता येतील व त्यामधून सुमारे २०० रुग्णांना मदत होइल.
राज्यातील पाच हजार सदस्य हे सुमारे दहा हजार मशीन खरेदी करु शकतील व या दहा हजार मशीन द्वारे राज्यातील ५० हजार कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येइल . त्यासाठी शासनाने १५ व्या वित्त आयोगाचा निधी पंचायत समिती सदस्यांना खर्च करण्याची परवानगी द्यावी व सदस्यांनी या १५ व्या वित्त आयोगातुन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन खरेदी करावे असे ते म्हणाले .
0 Comments