Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूजला विद्युत दाहिनी मंजूर करा : आ रणजितसिंह मोहिते पाटील

अकलूजला विद्युत दाहिनी मंजूर करा : आ रणजितसिंह मोहिते पाटील

कोवीड हॉस्पिटलसाठी आमदारद्वयांची २० लाखाची मदत

          अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज हे मेडीकल हब असल्याने मोठ्या प्रमाणात कोवीडचे रुग्ण अकलूजच्या खाजगी रुग्णालयात दाखल होता . त्यामध्ये दैनंदिन पाच  ते सहा रुग्ण कोवीडमुळे दगावतात . अशा रुग्णांचे अंतीम क्रियाकर्म करण्यासाठी अकलूजला विद्युत दाहिनी मंजूर करावी अशी मागणी आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली .  अकलूजच्या शासकीय कोवीड हॉस्पिटलसाठी आ मोहिते पाटील व आ राम सातपुते यांनी आमदारफंडातून २० लाख रुपये देण्याचे जाहिर केले.

          माळशिरस तालुक्यातील कोवीड रुग्णांच्या सोयीसुविधा व अडचणी बाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. याबैठकीत तालुक्यातील कोवीड रुग्णांच्या सोयी सुविधा व अडचणींचा आढावा घेण्यात आला.

          पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, निवडणुकीनंतर पालकमंत्री भेटले नाहीत अशा तक्रारी आल्या . परंतु पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यात कोवीड संदर्भात बैठक घेता आली नाही . कोणाला भेटता आले नाही .  काल जिल्हाधिका-यांनी अचारसंहिता उठविली त्यामुळे आज बैठक घेता आली . माळशिरस तालुक्यात अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असल्याने कोवीड बाबत उत्तम काम आहे . तालुक्यात १ लाख ११ हजार १७२ चाचण्या झाल्या . आज  १६८० रुग्ण पॉझिटिव्ह आले . त्यापैकी ४३० रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाले आहेत . जे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्यासाठी अकलूज , माळशिरस , महाळूंग व नातेपुते येथे शासकीय कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे तर ग्रामीण भागात वेळापूर व मोरोची येथे प्रायोगिक तत्वावर खाजगी डॉक्टरांच्या सहकार्याने कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ  राम सातपुते यांनी अकलूज येथील एमटीडीसी मध्ये होणाऱ्या कोवीड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लॅंट बसविण्यासाठी २० लाख रुपये आमदार फंडातून देण्याचे जाहिर केले आहे तर अकलूज हे मेडीकल हब असल्याने कोवीडची रुग्णसंख्या अधिक आहे व मृत्यूचे प्रमाण रोज पाच ते सहा आहे त्यासाठी येथे सुमारे सव्वाकोटी रुपये खर्चाची विद्युत दाहिनी व्हावी अशी मागणी आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे त्यासाठी आपण प्रयत्न करु तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे तो भरून काढण्यासाठीही  आपण सहकार्य करु असे ते म्हणाले . 

          याबैठकीस आ रणजितसिंह मोहिते पाटील , आ राम सातपुते , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी शीतलकुमार जाधव, सिव्हील सर्जन प्रदीप ढेले, प्रांताधिकारी शमा पवार, पोलिस उप अधीक्षक निरज राजगुरु , सभापती शोभा साठे, गटविकास अधिकारी स्मीता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते , उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक श्रेणीक शहा , इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संतोष खडतरे यांच्यासह  अधिकारी व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते .

Reactions

Post a Comment

0 Comments