दूध उत्पादकांनी केंद्र शासनाचे प्रति महिना रुपये 3000/- प्रमाणे पेंशन योजनेत सहभाग घ्यावा धैर्यशील मोहिते पाटील यांचे आवाहन

अकलूज (कटूसत्य वृत्त): दूध उत्पादक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात फायदेशीर ठरणाऱ्या व दरमहा तीन हजार रुपये पेंशन मिळणाऱ्या प्रधानमंत्री किसान पेंशन योजनेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी केंद्र शासनाने तयार केली असून या योजनेचा अधिकाधिक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
मोहिते पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना भारतीय जीवन विमा (LIC) मार्फत सुरू केली आहे. दूध उत्पादक स्वतः पण स्वतंत्र योजनेमध्ये सभासद होऊ शकतो आणि प्रीमियमची रक्कम भारतीय जीवन विमा निगम कडे जमा करू शकतो. सदर योजना ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत फायद्याची ठरणार आहे. म्हातारपणी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हातारपणासाठी शेतकऱ्यांची कुठलीही ठोस बचत नसते. अशा शेतकऱ्यांना त्यांच्या म्हातारपणात ही योजना संपूर्ण आरोग्य व समाधानी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी शासनाकडून पेंशन योजनेच्या माध्यमातून ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल. त्यासाठी १८ ते ४0 वयोगटातील दूध उत्पादकांची वयोमर्यादा असणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे एक किंवा एकापेक्षा जास्त दूध देणारी जनावरे असावीत. दरवर्षी कमीत कमी 500 लिटर दूध आणि कमीत कमी 180 दिवस दूध संस्थेस दूध पुरवठा करणे गरजेचे आहे. दूध उत्पादक हा आयकर भरणारा नसावा. वय मर्यादेनुसर दरमहा शुल्क भरणा करावा लागणार आहे. यासाठी ५० ते २०० रुपये पर्यंत मासिक हप्ता वयाच्या ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत शासनाच्या पेंशन फंडा मध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकरी पती पत्नी स्वतंत्रपणे या योजनेत सहभागी होऊ शकतात. सेवानिवत्त तारखे पूर्वी शेतकऱ्यांचे निधन झाल्यास पत्नीस दरमहा ५० टक्के मासिक पेंशन मिळणार असून या योजनेत माळशिरस तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाग घेऊन सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शिवामृत दूध संघाच्या दूध संकलन केंद्राशी संपर्क साधावा असेही ते म्हणाले.
यावेळी संघाचे व्हा.चेअरमन सावता ढोपे, संचालक दत्तात्रय भिलारे, हरिभाऊ मगर, सचिन रणनवरे, कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख यांच्यासह संचालक व अधिकारी उपस्थित होते.
0 Comments