कोरोनातून बरे झाल्यानंतर आमदार रणजितसिंह लागले कामाला ; तातडीने बैठक घेऊन रुग्ण व नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी सतर्क राहण्याच्या प्रशासनाला सूचना
अकलूज (कटूसत्य वृत्त): मेडिकल हब असल्याने अकलूज येथे सोलापूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातीलही कोरोना रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्या तुलनेत येथे ऑक्सिजन व रेमडीसीवरचा प्रचंड तुटवडा निर्माण होत आहे. यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व विभागीय आयुक्त सौरभ राव यांना केली. आमदार रणजितसिंह यांच्या विनंतीनंतर सौरभ राव यांनी ऑक्सिजनचा टँकर तातडीने सोलापूर कडे रवाना केला आहे.
कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज (गुरुवार दि. २२ ) अकलूज येथे प्रशासकीय अधिकारी व माळशिरस तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांची संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी सर्व डॉक्टर्स व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऑक्सीजन आणि रेमडिसीवरचा तुटवडा यासंदर्भातील कैफियत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासमोर मांडली. त्यावेळी आमदार रणजितसिंह यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भातील तक्रारीचा सुर मांडला. त्याशिवाय त्यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधून या समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भातील चर्चा केली. पुढील दोन दिवसात ऑक्सीजन व रेमडिसीवरचा तुटवडा कमी होईल असे अभिवचन पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आमदार रणजितसिंह यांना दिले . सोलापूर साठी तात्काळ लिक्विड ऑक्सीजनचा टँकर पाठवतो असे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. या बैठकीला भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, प्रांत अधिकारी शमा पवार, पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रेनिक शहा ,आयएमए चे अध्यक्ष डॉ. संतोष खरतडे, सचिव डॉ. नितीन राणे,पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, डॉ. नितीन एकतपुरे, डॉ. धनेश गांधी, डॉ. सुधीर पोफळे, ऑक्सीजन पुरवठादार दृश्यांत ताम्हाणे, सचिन गायकवाड यांच्यासह तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोरोना झाला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तातडीची बैठक आयोजित करून रुग्ण व नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
तातडीचे उपचार करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्व उद्योग साखर कारखाने आदी ठिकाणच्या सिलेंडर टाक्या उपलब्ध केल्या जाव्यात अशा सूचना आमदार रणजितसिंह मोहिते यांनी प्रशासनास दिल्या. ज्या रुग्णांना सौम्य ऑक्सिजनची गरज आहे अशांसाठी हवेतील ऑक्सिजन घेऊन रुग्णांना ऑक्सिजन देणारे यंत्र उपलब्ध व खरेदी करण्यावर भर द्यावा असे आमदार रणजितसिंह यांनी सांगितले. अकलूज येथे ऑक्सीजन निर्मितीचा प्लांट उभा करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. १ मे पासून होणाऱ्या मेगा लसीकरण मोहीमेवेळी गर्दी टाळण्यासाठी लस घेणाऱ्यांच्या नोंदीप्रमाणे ज्यांचा नंबर आला आहे त्यांनाच बोलावून लस द्यावी त्यासाठी वॉर रूम सुरू करावी असे धैर्यशील मोहिते -पाटील यांनी यावेळी सुचवले. प्रत्येक गावात सकाळ-संध्याकाळ जाऊन दक्षता घेण्यास संदर्भातील दवंडी द्यावी या संदर्भात येथे चर्चा झाली. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात पोलीस यंत्रणा जनजागृती संदर्भातील दवंडी देण्याचे कार्य सुरू करेल असे पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांनी या बैठकीत सांगितले.
रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि प्रशासन यांना मोठ्या भीषण समस्येचा सामना करावा लागत आहे. उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि रुग्ण संख्या यामध्ये खूप मोठी तफावत आहे. लागणारी औषधे व यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर आपला पाठपुरावा सुरू आहे. पुढील दोन दिवसात या संदर्भातील टंचाई कमी होणे अपेक्षित आहे. - आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील
मोठे मेडिकल हा असल्याने माळशिरस तालुक्यात शेजारील तालुक्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत आहेत. सध्या येथे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर वरील रुग्णांची संख्या ४२२ आहे. त्यापैकी १७० रुग्ण हे इंदापूर, माढा, करमाळा, बारामती परिसरातील आहेत. त्या तुलनेत येथे रेमडिसीवर व ऑक्सिजनचा पुरवठा केवळ दहा टक्केच उपलब्ध होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. - शमा पवार, प्रांताधिकारी ,अकलूज
0 Comments