दिपकआबा साळुंखे पाटील यांनी घेतली माजी मंत्री महादेव जानकर व परिवाराची सांत्वनपर भेट

सांगोला (कटूसत्य वृत्त): राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री आम. महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर यांचे वृद्धापकाळाने 93 व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शुक्रवार दि 2 एप्रिल रोजी पळसवडे ता.माण जि. सातारा येथील महादेव जानकर यांच्या निवासस्थानी जावून त्यांची व त्यांच्या संपूर्ण परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.
माण तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा पळसवडे या छोट्याशा गावात जन्म घेतलेल्या महादेव जानकर यांनी आपल्या संघटन कौशल्य आणि झोकून देण्याच्या कामाच्या पद्धतीमुळे संपूर्ण देशभर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्य पोहचविले. त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात त्यांची मातोश्री गुणाबाई जानकर यांचे संस्कार आणि त्यांनी दिलेली नैतिक शिकवण यांचा फार मोठा वाटा होता.आईने केलेले संस्कार आणि लढण्याची दिलेली शिकवण या बळावर महादेव जानकर यांनी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पदापर्यंत मजल मारली. धनगर समाजासाठी त्यांनी केलेले कार्य राज्याला चिरकाल स्मरणात राहील असेच आहे. यामुळे राज्यात बहुजनांचा नेता म्हणून त्यांनी जी राजकीय ओळख निर्माण केली आहे त्या मागे त्यांच्या आईचा मोठा हात आहे. म्हणूनच त्यांच्या आईच्या निधनामुळे केवळ जानकर परिवारच नाही तर संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशी भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बोलून दाखवली. तसेच आईच्या निधनामुळे जानकर कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि साळुंखे पाटील परिवार सहभागी असल्याचे सांगितले.व गुणाबाई जानकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
0 Comments