एचआरसीटी चाचणीबाबत नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक

सोलापूर, (कटूसत्य. वृत्त.): कोविड-19 निदानासाठी जिल्ह्यात काही दवाखाने हाय रिझॉल्यूशन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (एचआरसीटी) चाचणी करून उपचार करीत आहेत. याची माहिती स्थानिक प्रशासनाला होत नाही. ही माहिती संकलन करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव आणि महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.बिरुदेव दुधभाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियुक्ती केल्याचा आदेश जारी केला आहे.
डॉ. शितलकुमार जाधव सोलापूर ग्रामीण, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात आणि डॉ. बिरूदेव दुधभाते महापालिका क्षेत्रात कामकाज पाहतील. बऱ्याच आजारामध्ये कोरोनासदृश्य आजाराच्या बाबी दिसल्या की त्यांची एचआरसीटी चाचणी करून उपचार केले जात आहेत.
नोडल अधिकारी खालीलप्रमाणे कामकाज पाहतील
- एचआरसीटीद्वारे कोविड-19 निदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे वय, संपर्क क्रमांक, पूर्ण पत्ता आदींची माहिती संबंधित निदान केंद्र (डायग्नोस्टिक सेंटर) यांनी स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका स्वतंत्र कक्ष तयार करतील.
- रूग्णास ज्या रूग्णालयातून एचआरसीटीसाठी संदर्भित केले आहे, त्या रूग्णालय प्रमुखाने एचआरसीटीद्वारे संशयीत/निदान केलेल्या व्यक्तींचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता यांची माहिती स्थापन केलेल्या कक्षाला देणे बंधनकारक आहे.
- रूग्ण दाखल असलेल्या रूग्णालयाने रूग्णाचा एचआरसीटीमध्ये कोविड निदान झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित रूग्णाची मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून आरटीपीसीआरद्वारे कोविड चाचणी 24 तासांत करणे बंधनकारक आहे.
- स्थानिक प्रशासन एचआरसीटीद्वारे निदान झालेल्या रूग्णांची माहिती मिळताच रूग्ण दाखल असलेल्या रूग्णालयाशी संपर्क करून रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी केल्याची खातरजमा करणार आहे. अहवाल सकारात्मक आल्यास मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड साथ नियंत्रणासाठी जवळच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्याची कोविड-19 चाचणी करावी आणि लक्षणानुसार अलगीकरण, विलगीकरण करावे.
0 Comments