Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शीत वंचित बहुजन आघाडीचा बंद यशस्वी; आरएसएसवर बंदीच्या मागणीला बार्शीकरांचा शंभर टक्के पाठिंबा

 बार्शीत वंचित बहुजन आघाडीचा बंद यशस्वी; आरएसएसवर बंदीच्या मागणीला बार्शीकरांचा शंभर टक्के पाठिंबा

बार्शी (कटूसत्य वृत्त) :– राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज बार्शी शहरात दिलेला बार्शी बंद पूर्णतः यशस्वी ठरला. व्यापारी, वाहतूकदार, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या बंदला पाठिंबा दर्शविल्याने शहरात दिवसभर शांतता आणि शिस्तबद्ध वातावरण राहिले.

सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहरातील प्रमुख चौकांवर उतरले होते. दुकाने, आस्थापने, बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी “आरएसएसवर बंदी घाला”, “घटनेच्या मूल्यांवर आघात थांबवा”, “लोकशाही वाचवा” अशा घोषणा देत निदर्शने केली.

या आंदोलनादरम्यान शहरात कुठेही अनुशासनभंग किंवा हिंसाचाराची घटना घडली नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, “देशात द्वेष आणि विभाजनाचे राजकारण करणाऱ्या संघटनांवर कायदेशीर कारवाई करावी. आरएसएसचे कार्य भारतीय संविधानविरोधी असून, समाजात तणाव निर्माण करण्याचे काम ते करतात.”

बार्शी शहरातील अनेक सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि युवकांनीही या बंदला शंभर टक्के समर्थन दिले. दिवसभर रस्त्यावर गाड्यांची वर्दळ नव्हती, शाळा–कॉलेजही बहुतेक ठिकाणी बंद राहिली.संध्याकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनात आरएसएसवर तात्काळ बंदी घालावी, संविधानाचे पालन करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या या बंदने पुन्हा एकदा बार्शीकरांचा जागरूक आणि संविधाननिष्ठ नागरिक म्हणूनचा ठसा उमटवला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments