Hot Posts

6/recent/ticker-posts

जातीय हल्ल्यातील आरोपींवर मकोका लावा - सुरेश पाटोळे

 जातीय हल्ल्यातील आरोपींवर मकोका लावा - सुरेश पाटोळे 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई गावात मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागकर याच्यावर झालेल्या भीषण आणि अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आज राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

संघटनेने या घटनेतील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय आर्थिक मदत आणि संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

घटनेचा तपशील देताना क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे म्हणाले, “सोनई येथील मातंग समाजातील संजय वैरागकर याच्यावर 15 ते 20 गुंडांनी अत्यंत निर्दयपणे हल्ला केला. त्याच्या हातपायांवरून मोटारसायकल फिरवून त्याचे हातपाय मोडले, चेहऱ्यावर फायटरने वार करून त्याचा एक डोळा निकामी केला आणि शरीरावर लघवी करण्याचा घृणास्पद प्रकार केला. ही घटना केवळ एखाद्या व्यक्तीवरचा हल्ला नाही, तर समाजाच्या आत्मसन्मानावरचा हल्ला आहे.”

सध्या गंभीर जखमी अवस्थेत असलेला संजय वैरागकर याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संभाजी लांडे, संदीप लांडे, राजू मोहिते, गणेश चव्हाण, विशाल वने, महेश दरंदले, शुभम मोरे, अक्षय शेटे, नितीन शिंदे, स्वप्निल भळगट, हासणे आदींविरोधात अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर कलमांअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सेनेचे पदाधिकारी म्हणाले की, “या गुंडांना राजकीय पाठबळ असल्याचा संशय आहे. म्हणूनच पोलिसांनी या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

या निवेदनावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, शहराध्यक्ष विजय अडसुळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे, शहर उपाध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, प्रवीण वाडे, किशोर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments