मोहोळच्या क्षीरसागर पिता-पुत्रांची पाच वर्षांनी भाजपमध्ये घरवापसी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोहोळमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर हे पिता पुत्र सुमारे पाच वर्षांनंतर भारतीय जनता पक्षात घरवापसी करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (ता. २९ ऑक्टोबर) मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
मोहोळचे क्षीरसागर कुटुंबीय हे आधी जनसंघात आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात कार्यरत होते. नागनाथ क्षीरसागर यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून १९९९ आणि २००४ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यानंतरची २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेने उत्तमप्रकाश खंदारे यांना उमेदवारी दिल्यानंतर नागनाथ क्षीरसागर यांनी अपक्ष निवडणूक लढवून दोन नंबरची मते घेतली होती.
पुढच्या २०१४ च्या निवडणुकीत नागनाथ क्षीरसागर यांचे बंधू संजय क्षीरसागर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मोहोळच्या क्षीरसागर कुटुंबीयाने शिवसेनेत जाणे पसंत केले. मात्र क्षीरसागर कुटुंबीय पहिल्यापासून भाजप-शिवसेना विचारांचे कट्टर समर्थक राहिलेले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीतही सोलापूर मतदारसंघातून क्षीरसागर हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांना डावलून भाजपने राम सातपुते यांना सोलापूरच्या रणांगणात उतरविले होते. आता पुन्हा पाच वर्षांनंतर नागनाथ क्षीरसागर हे उद्या पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. क्षीरसागर कुटुंबाने आतापर्यंत लढवलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कायम दोन नंबरची मते घेतली आहेत.
नागनाथ क्षीरसागर यांनी भाजपच्या राष्ट्रीय, प्रदेश कार्यकारिणीवर काम केले आहे. तसेच, भाजपच्या अनुसुचित जाती जमाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर कुटुंबीयांचा भाजप प्रवेश महत्वपूर्ण मानला जातो. तालुक्याबरोबरच, मोहोळ शहरातही क्षीरसागरांचे मतांचे पॉकेट आहे, त्यामुळे मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला फायदाच होणार आहे.
क्षीरसागर कुटुंबीयाने आतापर्यंत कायम प्रवाहाच्या विरोधात राजकारण केले आहे. मात्र, फसव्या मित्रांपेक्षा दिलदार विरोधक बरा म्हणून आम्ही पुन्हा भाजपमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.

0 Comments