महिलांनी उद्योजकतेकडे वळावे – सौ.चौहान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिलांनी उद्योजकतेकडे वळून देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन उद्योग वर्धिनीच्या प्रमुख सौ. चंद्रिका चौहान यांनी केले. त्या उद्योग वर्धिनी, स्वावलंबी भारत अभियान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत उद्यम इन्क्यूबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सक्षमीकरण व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिरात बोलत होत्या.
हे शिबिर जोडभावी पेठ परिसरातील महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वयंरोजगाराकडे प्रवृत्त करणे, लघुउद्योग स्थापनासाठी मार्गदर्शन करणे आणि उद्यमशीलतेच्या माध्यमातून स्वावलंबन वाढविणे हा होता.
सौ. चौहान म्हणाल्या, “महिलांनी उद्योग क्षेत्रात सक्षमपणे पुढाकार घेतला, तर भारत माता परम वैभवाकडे जाण्याचा मार्ग अधिक वेगाने खुला होईल. प्रत्येक महिलेनं आपले कौशल्य ओळखून आर्थिकदृष्ट्या सबल होण्याचा निर्धार करावा.”या प्रसंगी स्वावलंबी भारत अभियानाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी. चन्नवीर बंकुर, डॉ. राजेश गुराणे (CO, उद्यम सेंटर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ) आणि नितीन माळी यांनी महिलांना व्यवसाय नियोजन, निधी प्राप्ती, विपणन तंत्रे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला रंजिता चाकोते, सागर अतनूरे, सतीश पारेली, गुरुराज पदमगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमाचे आयोजन रोहित बिद्री यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मयूर वडतीले, अक्षय बिराजदार, नागराज बिरादार, रितेश भोसले, शुभम वडतीले, प्रज्वल राऊत, विनायक शिवशेट्टी आदींनी परिश्रम घेतले.
या शिबिराला जोडभावी पेठ भागातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनेक महिलांनी उद्यमशीलतेबाबत नव्या संकल्पांसह सहभाग नोंदवला.

0 Comments