नक्की काय आहे मालकांच्या मनात ?
कधी येणार निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या ध्यानात ?
राजन पाटलांच्या सत्तावैभवाचा प्रत्येकालाच वाटतोय हेवा

मालक विरोधकांपेक्षा पक्षातीलच पक्षभेदीवर लक्ष ठेवा
मोहोळ (साहील शेख)(कटुसत्य. वृत्त.): गेल्या महिनाभरापासून मोहोळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या आणि मोहोळ शहरात नगर परिषदेच्या निवडणूक पूर्व रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय विरोधात एकवटले असतानाही राजन पाटील यांनी आजवरच्या अनुभवाची आणि मुत्सद्दीपणाची चुणुक संपूर्ण राज्याला दाखवत हा मतदारसंघ पुनश्च राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. यांनी अत्यंत कर्तव्यदक्ष आणि विकास कामासाठी प्रामाणिकपणे झटणारे आणि सर्वसामान्यांबद्दल पोटतिडीक असलेल्या युवा उमेदवार यशवंत माने यांना वीस हजार पेक्षाही जास्त मतांनी विजयी करत पुनश्च आपणच मोहोळ शहर आणि तालुक्याचे किंगमेकर असल्याची खात्री सर्वपक्षीयांना करून दिली. आमदार यशवंत माने यांनी देखील राजन पाटील यांनी दिलेल्या संधीचे सोने करत मोहोळ शहरात १५ कोटी पेक्षा जास्त निधी खेचून आणत शहराच्या सर्वांगीण विकासाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत.
मात्र मोहोळ शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणात गेल्या महिन्यापासून अप्रत्यक्ष पक्षभेदी गटबाजीला प्रारंभ झाला आहे. जरी राज्याच्या राष्ट्रवादीतील एक सुप्त विचार प्रवाह राजन पाटील यांच्या विरोधातील प्रवाहाला अप्रत्यक्ष बळ देत असला तरी दुसरा प्रगल्भ आणि प्रभावशाली प्रवाह राजन पाटील यांनी पक्षासाठी आजवर केलेल्या मेहनतीची आणि परिश्रमाची दखल घेऊन वेळोवेळी होत असलेल्या निवडणुकीचे कारभारपण त्यांनाच देत आला आहे. पक्षश्रेष्ठी शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत राजन पाटील यांनी पक्षनिष्ठेचा धर्म आजवर तितक्याच पवित्रतेने पार पाडला आहे. त्या कामाची शाबासकी जरी नाही मिळाली तरी चालेल त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले अथवा नाही झाले तरीही चालेल मात्र पक्षाला विरोध करून विरोधी पक्षाला साथ देऊन राष्ट्रवादीचा अनगर गट कसा राजकारणातून नाहीसा होईल? यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्या व्यवहारिक निष्ठेच्या पक्षभेदींची दखल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पक्ष पातळीवरून घेतली जावी अशी राजन पाटील यांच्या निष्ठावंत समर्थकांची रास्त अपेक्षा आहे. पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली तर उत्तमच मात्र विविध निवडणुकीमध्ये राजन पाटील यांना विरोध करणाऱ्या पक्षविरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम जिगरबाज राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी करून दाखवले आहे.
केवळ विधान सभेवरच विजयी करून आमदार करणारे राजन पाटील किंगमेकर नसून कित्येक निवडणुकीत विजयी झालेल्या कार्यकर्त्यांना मोठे पद मिळवून देण्याचा मनाचा मोठेपणा त्यांनी आजवर दाखवून दिला. पक्षाबाहेर गेलेल्या अनेकांना पुन्हा माफ करून पक्षात घेत मोठमोठ्या पदावर त्यांनी वेळोवेळी संधी दिली. इतकंच नाही तर ज्या काँग्रेसने वेळोवेळी राजन पाटील यांना राजकीय कोंडी करत विरोधी पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न तालुक्यात केला. त्याच काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य देण्याची शब्दपूर्ती राजन पाटील यांनी वेळोवेळी पूर्ण केली.
तरीही मीठ आळणी असलेल्या राजन पाटलांना पक्षाअंतर्गत नेहमीच गटबाजीचा सामना वेळोवेळी करावा लागत आहे. जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या राजकारणात सातत्याने अभिमन्यु होऊन देखील कधी पक्ष सोडण्याचे महाभारत त्यांनी केले नाही. पक्षातील अनेक जण विरोधकांच्या संपर्कात राहून राजन पाटील यांचा सामर्थ्यशाली गट नामशेष कसा होईल यासाठी प्रयत्न करत असल्याचे सर्वसामान्यांना स्पष्टपणे जाणवत आहे. तरीदेखील राजन पाटील यांनी एका शब्दानेही कधी संबंधित पक्षभेद करणाऱ्यांना दुखावले नाही.
मोहोळ तालुक्याच्या राजकारणात देखील ते अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या गटबाजीचा सामना सध्या करत आहेत. राजन पाटील यांनी आजवर पक्षासाठी जितकं काही केलं त्या पटीत पक्षाकडून त्यांना केवळ आणि केवळ गटबाजीला पाठबळ मिळणाऱ्या गोष्टी घडल्या.
गोष्ट डीसीसी बँकेचा चेअरमनपदाची असो अथवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची. गोष्ट विधानपरिषदेची असो अथवा पदवीधर मतदारसंघातून मिळणाऱ्या उमेदवारीची. राजन पाटील यांनी कधीही पक्षाकडे मला हेच पद मिळावे असा अट्टाहास धरला नाही. राजन पाटील हे निष्ठावंत असले तरी स्वाभिमानी स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी तालुक्यातील गटबाजीला पक्षाकडून मिळणाऱ्या अप्रत्यक्ष बळाबाबत कधीही पक्षश्रेष्ठींना सौम्य शब्दांत देखील जाब विचारला नाही किंवा त्यांचा तो स्वभाव नाही. मात्र त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध करणार्यांना निवडणुकीत त्यांची कशी जागा दाखवायची हे देखील राजन पाटील कधी बोलून दाखवत नाहीत हा त्यांच्या सुचक स्वभावाचा भाग मानावा लागेल.
राजन पाटील यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न जितका विरोधकांकडून होतो तितकाच कधीकधी पक्षातील लोकांकडूनही होत आला आहे ही बाब कोणीही नाकारणार नाही. मात्र या सर्व गोष्टी राजन पाटील यांनी फ्रि माइंड आणि शांत स्वभावाने सहजरित्या घेत हसत-खेळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध करणाऱ्यां अनेकांना चितपट केले. राजन पाटील यांची कारकीर्द जरी संघर्षमय असली तरी त्यांचा स्वभाव कधीही राजकीय आतातायीपणाचा नाही. त्यांनी आजवर जितके विरोधकांना चितपट केले त्यापेक्षाही जास्त वेळा त्यांनी पक्षात राहून त्यांना विरोध करणाऱ्यांना चितपट करून दाखवले आहे. त्यामुळे संयमी राजन पाटील यांच्या 'त्या' सरळ स्वभावाचा अंत आजतागायत भल्याभल्यांना लागला नाही. राजन पाटील यांच्या वैयक्तिक द्वेषापोटी राष्ट्रवादी पक्षाचाही द्वेष करणारे अनेक जण आहेत. मात्र पक्षात राहून राजन पाटील यांची जागा घेण्यासाठी धडपडणारे अनेकजण नंतर स्पर्धेत तर राहत नाहीतच नाही मात्र इतर कोणत्याही पक्षाच्या पदांच्या यादीत पुन्हा दिसले नाहीत हा देखील एक सामर्थ्यशाली आणि विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.
0 Comments