मंडल अधिकारी ननवरे यांची विभागीय चौकशी करून निलंबित करावे - नगरसेवक बनसोडे ; जिल्हाधिकारी यांच्याकडे केली ऑनलाईन निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर (कटूसत्य. वृत्त.):- सांगोला मंडल मधील (सर्कल) मंडल अधिकारी आर.टी. ननवरे यांची विभागीय चौकशी करून निलंबित करणे अशी मागणी सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक सुरज दिवाकर बनसोडे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे ऑनलाईन निवेदनाद्वारे केली आहे.
मंडल अधिकारी ननवरे हे नागरिकांची कामे वेळेवर करीत नाहीत. कार्यालयामध्ये शासकीय वेळेत न येणे,वारंवार गैरहजर राहणे तसेच अनेक पेंडिंग नोंदी जाणीवपूर्वक हेतू परस्पर विलंब करणे,यासह आर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्या नोंदी ताबडतोब करणे व सामान्य नागरिकांना विनाकारण नोंदी अडवणूक करून वेठीस धरून नोंदी थांबवण्याचे काम करीत आहेत. या अधिकाऱ्याच्या काळामध्ये सर्वात जास्त नोंदी पेंडिंग राहिलेल्या आहेत ,तसेच सातबारा उताऱ्यावर आर्थिक देवाण-घेवाण करून चुकीची नावे लावण्याचे काम करीत आहेत.
तसेच शासकीय डोंगल खाजगी लोकांच्या ताब्यात देत आहेत, त्यामुळे खाडाखोड व चुकीची नावे नोंदी होत आहेत. तसेच अतिवृष्टी नुकसान पंचनामा मध्ये परस्पर फेरफार करून ठराविक लोकांना लाभ देण्याचे काम केलेले आहे. तरी वरील सर्व बाबींचा विचार करून याची सत्यता तपासून पहावी व विभागीय चौकशी लावून दोषी आढळल्यास निलंबित करण्याची व बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा नाईलाजाने लोकशाही पद्धतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस या नात्याने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरसेवक सुरज बनसोडे यांनी दिला आहे.
0 Comments